Pune University Bridge : विद्यापीठ परिसरातील उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात; हे असतील पर्यायी मार्ग
पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठचौकातील बहूमजली उड्डाणपुलाचं काम अखेर सुरु झालं आहे. मागील काही वर्ष अनेक कारणांमुळे या पुलाचं काम रखडलं होतं.
Pune University Bridge : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठचौकातील (Pune University Bridge) बहुमजली उड्डाणपुलाचं काम अखेर सुरु झालं आहे. मागील काही वर्ष अनेक कारणांमुळे या पुलाचं काम रखडलं होतं. पूल नसल्याने पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. मात्र पुलाचं काम सुरु झाल्याने पुणेकरांची येत्या काही वर्षात वाहतूक कोंडीपासून सुटका होण्याची शक्यता आहे. पुलाचं काम सुरु झाल्याने सध्या मात्र मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून तीन पर्यायी रस्ते तयार केले जाणार आहेत.
पुणे मेट्रोचं काम सध्या जोरात सुरु आहे. शिवाजी नगर ते हिंजवडी या मार्गाचं कामदेखील सुरु झालं आहे. बाणेर परिसरातून या कामाची सुरुवात झाली आहे. पीएमआरडीए यांच्या तर्फे बहुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा पूल लवकरात लवकर मुदतीपेक्षा कमी महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
2024 पर्यंत काम पूर्ण होणार
विद्यापीठ चौकात फ्लाय ओव्हर आणि त्यावरुन मेट्रो धावणार आहे. पुण्यातील विद्यापीठ चौकात चार मजली उड्डाणपूल बनणार आहे. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार असल्याचा दावा पीएमआरडीए आणि पुणे पालिकेकडून करण्यात आला आहे. या सगळ्या कामासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. येत्या सप्टेंबर 2022 पासून कामाला सुरुवात होऊन नोव्हेंबर 2024 पर्यंत होणार कामाची पूर्तता होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार
पुण्यातील विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार असल्याची माहिती आहे. पीएमआरडीए आणि पुणे महापालिका अधिकारी एकत्रित काम करणार असल्याचं जाहीर केलं होतं. या सगळ्याचं प्लॅनिंग किंवा मार्ग नेमका कसा असेल यासाठी त्यांनी एक प्रेझेंटेशन तयार करुन माहिती दिली होती. विद्यापीठ चौकात शहरातील सर्व मुख्य रस्ते मिळत असल्याने मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे गेले अनेक दिवस ही वाहतूक कोंडी फुटावी यासाठी प्रयत्न केले जात होते. त्यावर आता तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे आणि पीएमआरडीएकडून थेट प्रेझेंटेशन तयार केलं होतं. त्यात नियोजन कसं असेल यासंर्भात सगळी माहिती देण्यात आली होती.
असे असतील नवे पर्यायी मार्ग
-सेनापती बापट रस्त्याकडून आलेल्या सर्व दुचाकी वाहनांना पाषाणकडे जाण्यासाठी मॉडर्न शाळेच्या आतून फक्त दुचाकींसाठी स्वतंत्र रस्ता उपलब्ध करुन दिला जाणार आहे. त्यामुळे या दुचाकी मुख्य चौकात न येता थेट पुढे पाषाणकडे आणि अभिमानश्री सोसायटीकडून बाणेर; तसेच औंधकडे जाऊ शकतील.
-औंधकडून येणाऱ्या वाहनांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आतमधून महापालिकेच्या स्वामी विवेकानंद शाळेच्या मागील बाजूने नवीन रस्ता केला जाणार आहे. हा रस्ता आयसीएस कॉलनीमधून भोसलेनगर रस्त्याला जोडला जाईल. या वाहनांना कॉसमॉस बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या समोरूनही विद्यापीठ रस्त्यावर येता येणार आहे.
-शिवाजीनगरकडून आलेल्या वाहनांना पाषाणकडे जाण्यासाठी मूलचंद कॉर्नर ते मॉडर्न महाविद्यालयापर्यंतचा रस्ता रुंद केला जाणार आहे.
-सर्व कामं 11 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करून 12 नोव्हेंबरपासून हे पर्यायी रस्ते सुरु करण्याचे पालिकेचं नियोजन आहे.