TET Exam Scam : यावर्षी झालेली 'टीईटी'ची परीक्षाही संशयाच्या भोवऱ्यात
TET Exam Scam : या वर्षी झालेली शिक्षक पात्रता परीक्षाही संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
TET Exam Scam : म्हाडा पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढू लागली आहे. पुणे पोलिसांकडून या प्रकरणी अटक सत्र सुरू असून आता या वर्षी झालेली शिक्षक पात्रता परीक्षाही संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पुणे पोलिसांनी लखनऊ येथून 'विनर सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड'चा प्रमुख सौरभ त्रिपाठी याला अटक करण्यात आली. दुबईत पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली. सौरभ त्रिपाठी ने 2017 साली जी.ए. टेक्नॉलॉजीला शिक्षण परिषदेचे परिक्षा घेण्याचे कंत्राट मिळवून देण्याचे काम केले होते. सौरभ त्रिपाठी हा न्यासा कंपनीला परिक्षा घेण्याचे कंत्राट मिळवून देण्यात ही सहभागी होता. त्यामुळे यंदाची टीईटी परीक्षाही संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
सौरभ त्रिपाठीने 2017 साली जी.ए. टेक्नॉलॉजीला शिक्षण परिषदेचे परिक्षा घेण्याचे कंत्राट मिळवून देण्यासाठी लायझनींगचे काम केले. त्यानंतर त्याने स्वत: ची विनर सॉफ्टवेअर नावाची कंपनी सुरू केली. त्यासाठी त्याने शिक्षण परिषदेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरले होते. टीईटी परीक्षेसाठीचे कंत्राट वर्ष 2017 ते 2020 पर्यंत जी. ए. टेक्नॉलॉजीकडे होते. मागील वर्षी हे कंत्राट सौरभ त्रिपाठीच्याच विनर कंपनीला देण्यात आले आहे. त्याशिवाय सौरभ त्रिपाठी हा न्यासा कंपनीला परिक्षा घेण्याचे कंत्राट मिळवून देण्यात ही सहभागी होता. न्यासा कंपनीकडे आरोग्य भरतीची परिक्षा घेण्याचे कंत्राट आहे. सौरभ त्रिपाठीच्या चौकशीतून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
पुणे पोलिसांनी मंगळवारी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे आणि बंगळुरूमधून जीए टेक्नॉलॉजीच्या प्रमुख अश्विनकुमार यांना अटक केली असल्याची माहिती दिली होती. सुखदेव डेरे हे टीईटी परीक्षेच्या वेळी नियंत्रक होते. तर, जी.ए. टेक्नॉलॉजीकडे या परीक्षेचे कंत्राट होते. 2018 मध्ये झालेल्या टीईटी परीक्षा घोटाळ्यात डेरे हा सूत्रधार असल्याची माहिती मिळाली. टीईटीची 15 जुलै 2018 रोजी परीक्षा पार पडली होती. या परीक्षेचा निकाल 12 ऑक्टोबर 2018 रोजी जाहीर झाला. पैसे घेतलेल्या उमेदवारांना उत्तरपत्रिकेतील ओएमआर रिकामे सोडण्यास सांगितले जायचे. उत्तरपक्षिका स्कॅन करताना या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका भरल्या जायच्या अथवा त्यांना गुण दिले जायचे. या आरोपींनी निकालात घोटाळा करताना खोटी प्रमाणपत्रे दिली असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले.