बँकेच्या कारभाराला वैतागून खातेदाराने बँकेलाच ठोकले कुलुप, कर्मचारी अडकले बँकेत
बँक खात्यातून गेलेल्या पैशांच्या तक्रारीवर अधिकाऱ्यांकडून योग्य दखल न घेतल्यामुळे वैतागलेल्या खातेदाराने बॅंकेलाच कुलुप ठोकलं आहे.

बारामती : कधी कधी बँकेतील धिम्या कारभाराला कंटाळून आपण सारेच वैतागत असतो. पण सहन करण्याशिवाय आपण काहीच करत नाही. पण बारामतीमधील एका खातेदाराने मात्र बँक खात्यातून गेलेल्या पैशांच्या तक्रारीवर अधिकाऱ्यांकडून योग्य ती दखल घेतली न गेल्यामुळे थेट बॅंकलाच कुलुप ठोकलं. विशेष म्हणजे बँक कर्मचारी यावेळी बँकेतच अडकून होते. हा सर्व प्रकार बारामती तालुक्यातील एका बँकेत घडला आहे.
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक या गावात घडलेल्या या प्रकारातील खातेदाराचे नाव राजेद्र रामचंद्र थोपटे असे आहे. दरम्यान या सर्व प्रकारानंतर थोपटे यांच्यावर कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खातेदार राजेंद्र थोपटे हे माजी सैनिक आहेत. त्यांचे युनियन बँक आँफ इंडिया शाखा कोऱ्हाळे बुद्रुक येथे खाते आहे. त्यांच्या या खात्यातून दोन वेळा एटीएमद्वारे अज्ञाताने 20 हजार रक्कम काढली. थोपटे यांनी एटीएम लोकेशनवरुन याबाबत काही माहिती मिळाली का? अशी विचारणा बँकेच्या अधिकाऱ्यांना केली. त्यांना समर्पक उत्तर आले नाही म्हणून बँकेचे बाहेर असलेले लोंखडी गेटच त्यांनी बंद करत त्याला कुलुप लावून बँकेतील कर्मचाऱ्यांना आत कोंडून ठेवले.
पोलिसांनी घटनास्थळी पोहचत केली सुटका
या सर्व प्रकाराबाबत पोलिसांना माहिती मिळताच ते बँकेत आले. घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती घेऊन बँक कर्मचारी आणि आत अडकलेल्या खातेदारांची पोलिसांनी सुटका केली. बँकेचे व्यवहार थांबवून बँकेच्या कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा थोपटे यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आला आहे..
हे ही वाचा -
- MPSC विरु्द्ध सोशल मीडियावर लिहाल तर परीक्षेला बसू देणार नाही, आयोगाच्या भूमिकेवर विद्यार्थ्यांचा संताप
- कृष्णप्रकाश यांनी गुन्हेगारांवर खरंच झाड फेकून मारलं? नेमकी काय होती घटना अन् काय आहेत आक्षेप
- न्यू इअर सेलिब्रेशनसाठी प्लॅन करताय? त्याआधी जाणून घ्या निर्बंध
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha























