(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कृष्णप्रकाश यांनी गुन्हेगारांवर खरंच झाड फेकून मारलं? नेमकी काय आहे घटना
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पळून जाणाऱ्या आरोपींवर झाड फेकून त्यांना पकडल्याचा दावा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केला आहे. मात्र, या फिल्मी स्टाईल कारवाईबाबत अनेकांनी तिरकस कॉमेंट्स दिल्या आहेत.
पुणे : खुनाच्या आरोपातील तीन आरोपी पळून जाताना पोलिसांवर गोळीबार करत होतो. यावेळी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी झाड फेकून आरोपींना खाली पाडत पकडल्याचा दावा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हा दावा करताना एक प्रेस नोट प्रसिद्ध केली आहे. सध्या सोशल मीडियावर या प्रेस नोटची आणि झाडाच्या फोटोची जोरदार चर्चा आहे. मात्र, अनेकजण पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या या फिल्मी स्टाईल कारवाईबाबत तिरकस कॉमेंट्स करताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमधे योगेश जगताप नावाच्या तरुणाची भर दिवसा रस्त्यात गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. काही दिवसांच्या अंतरानेच पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत एकापाठोपाठ तिन हत्या झाल्या होत्या. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आणि पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश काय करतायत असा प्रश्न विचारला जात होता. अशावेळी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केलेल्या दबंग स्टाईल कारवाईची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.
नेमकी घटना काय?
योगेश जगताप यांच्या खुनातील गणेश मोटे, अश्विन चव्हाण आणि महेश माने हे तीन आरोपी चाकण भागातील कोये गावातील एका खोलीत लपून बसले होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांना याची खबर लागली. त्यावेळेस पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश हे आळंदी भागात होते. रात्री अकराच्या दरम्यान पोलिसांनी या घराला वेढा घातला. आरोपी बाहेर आलेच तर त्यांना कसे पकडायचे याची रेकी देखील करण्यात आली. मात्र, ऐनवेळी आरोपींना पोलिसांची चाहूल लागली आणि ते पण बाहेर पडून पळायला लागले. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यासह पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. आरोपी डोंगराच्या दिशेनी पळायला लागले. त्यावेळेस तीनपैकी आरोपी क्रमांक एकने डोंगराच्या दिशेने येणाऱ्या पोलीस पथकावर गोळीबार केला, तर आरोपी क्रमांक दोनने रस्त्याच्या दिशेने येणाऱ्या पोलीस पथकावर गोळीबार केला. आरोपींनी केलेल्या या गोळीबारानंतर पोलीस पथकातील पोलीस निरीक्षक टोणपे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांनीही आरोपींच्या दिशेने त्यांच्या सर्विस रिवॉल्वरमधून आरोपींच्या दिशेने गोळीबार केला. पण कोणाचीच गोळी कोणाला लागली नाही. मात्र, तेवढ्यात पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी तिथे पडलेले आठ ते दहा फुट उंचीचे झाड उचलले आणि आरोपींना फेकून मारले. त्यामुळे पळणारे आरोपी खाली पडले. त्यानंतर झेप घालून तिनही आरोपींना पकडण्यात आले. या झटापटीत आरोपी आणि पोलीस पथकातील कोणाला इजा झाली नाही किंवा दोन्हीकडून गोळीबार होऊनही कोणाला गोळी लागली नाही. मात्र, स्वतः कृष्ण प्रकाश याला अपवाद ठरले. या झटापटीत कृष्णप्रकाश यांच्या दोन्ही हातांना आणि कपाळाला इजा झाली आहे.
या घटनेनंतर कृष्णप्रकाश यांच्या दोन्ही हातांना बॅन्डेज गुंडाळल्याचे, त्यापैकी एक हात गळ्यात अडकवल्याचे आणि कपाळावर बॅन्डेज लावल्याचे फोटो पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आलेत. एवढच नाही तर कृष्ण प्रकाश यांनी आरोपींना जे झाड फेकून मारले ते झाड आरोपींबरोबर जप्त करण्यात आले आहे. ते झाड मुद्देमालाचा भाग म्हणून जप्त करण्यात आले आहे. ते झाड स्थानिक पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. एवढेच नाही तर या झाडाचे फोटोही पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आलेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या या फिल्मी स्टाईल कारवाईबाबत सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारले जातायत. फेसबुकवर ॲक्टीव असलेल्या विनय काटे यांनी असेच काही प्रश्न पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या या कारवाईबाबत उपस्थित केलेत.
विनय काटेंनी या कारवाईबाबत फेसबुकवर विचारलेले प्रश्न
1) 8 ते10 फूट उंच, जाड बुंध्याचे झाड मुळापासून उपटून फेकून मारले की ते झाड आधीच तिथे कुणी कापून ठेवले होते?
2) झाड आरोपींना समोरून फेकून मारले की मागून? समोरून झाड फेकून मारले तर आरोपी यांच्या दिशेने का पळत होते?
3) तीन आरोपी जिवाच्या आकांताने किंवा आक्रमकपणे डोंगराकडे पळत असताना ते एकमेकांना चिकटून, हातात हात गुंफून तर पळत नसतील. थोडे तरी अंतर असेल त्यांच्यात. त्यावेळी त्यांचा एकूण विस्तार नक्कीच 8 ते 10 फुटांपेक्षा जास्त असेल. मग एकाच झाडात तिघे कसे खाली पडले?
4) तिन्ही आरोपी पळताना एखादा तरी आरोपी बाकी दोघांच्या पुढे-मागे असेलच. तरीही झाड एकाच वेळी तिघांना कसे लागले असावे?
5) दोन्ही बाजूने प्रत्येकी दोन-दोनच गोळ्या का झाडल्या असाव्यात? एका तरी बाजूने जास्त गोळ्या चालाव्या ना?
6) डोंगराकडे वरच्या दिशेने पळत जाणाऱ्या लोकांवर 8-10 फुटांचे, मोठा बुंदा असलेले झाड (15-20 किलो वजनाचे) गुरुत्वाकर्षणाच्या विरूद्ध, खालून वरच्या दिशेने फेकून मारून तीन माणसांना एका टप्पुत आडवे पाडणे हे सामान्य माणसाचे काम वाटते का?
असो... जर बालपणी शेठजी मगर पकडू शकतात तर ह्या देशात सध्या काहीही शक्य आहे. कुणी आश्वासन फेका, कुणी झाड फेका... आम्ही झेलत राहू
अशी तिरकस कॉमेन्ट काटे यांनी शेवटी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: