Pune Shivsena News: रामदास कदम यांच्याविरोधात शिवसेनेचं जोडे मारो आंदोलन; पुण्यात शिवसेना आक्रमक
शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबियांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
Pune Shivsena News : शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी ठाकरे कुटुंबियांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यातील शिवसैनिक (Shivsena) आक्रमक झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील स्वारगेट (Swargate) चौकात शिवसेनेने रामदास कदम यांच्या फोटोला जोडे दाखवून जोरदार आंदोलन केले. पुण्यातील स्वारगेट परिसरात शिवसैनिकांनी आक्रमक होत हे आंदोलन केलं आहे.
या आंदोलनात रामदास कदमांच्या विरोधात विविध घोषणाबाजी करण्यात आल्या. त्यांचा फोटो देखील दहन करण्यात आला. गाढवाच्या शरीराला रामदास कदमांचा फोटो लावत शिवसैनिकांनी विरोध दर्शवला. शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात निदर्शनं केली. ठाकरे कुटुंबियांविषयी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी जे वक्तव्य केलं आहे. त्याचा निषेध आहे. ज्या बाळासाहेबांचा फोटो लावून सगळ्या महाराष्ट्रभर फिरत आहेत. हे चुकीचं आहे. भविष्यात देखील त्यांनी असा प्रकार केला तर त्यावर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ. शिवसेनेविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या गद्दारांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा देखील शिवसेनेने दिला आहे.
राज्यभर तीव्र आंदोलन
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामदास कदम यांच्याविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नाशिक, पुणे, औरंगाबादमध्ये शिवसेनेतर्फे तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. ज्या शिवसेनेने तुम्हाला मोठं केलं. नेतेपद दिलं त्याच शिवसेनेला आता नावं ठेवता. त्यांच्यावर टीका करता, त्यामुळे रामदास कदम यांच्या टीकेवरुन शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी शहराशहरात फोटो आणि पुतळा दहन करुन तीव्र आंदोलन केलं.रत्नागिरीत देखील शिवसैनिक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आले होते. रामदास कदमांचा पुतळा जाळण्याचा ठाकरे गटाने प्रयत्न केला असता शिंदे गटाने हा पुतळा हिसकावून घेतला होता. दोन्ही गटात मोठ्या प्रमाणात वादावादी झाली होती.
रामदास कदम काय म्हणाले होते?
शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी दापोली येथील सभेत केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेना नेते संतप्त आहेत. मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे, हे किती वेळा सांगाल? तुम्हाला शंका आहे का, अशा शब्दात रामदास कदमांनी टीका केली. यावरुन मुंबईसह कोकणातील शिवसेना नेत्यांच्या आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत. तसेच उद्धव ठाकरे कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत, अशी टीका रामदास कदम यांनी केली होती.