सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरतं मर्यादित न ठेवता, भारतरत्न द्यावा; शरद पवारांचं केंद्र सरकारला आव्हान
Sharad Pawar on Bharat Ratna: कोरोनासह विविध आजारांवर मात करण्यासाठी SII च्या लस निर्मितीवर सायरस पुनावाला यांनी भर दिला, त्यांच्या या मोलाच्या योगदानासाठी त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.
Sharad Pawar On Cyrus Poonawalla: पुणे : कोरोनामध्ये (Covid-19) लाखो रूपयांच्या लस मोफत वाटप करून, नागरिकांची मदत करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) संस्थापक सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांना केंद्र सरकारनं (Central Government) भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna Award) द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. सायरस पुनावाला यांनी लस निर्मिती क्षेत्रात केलेल्या कामाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुक केलं. पुण्यात (Pune News) आयोजित करण्यात आलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात बोलताना शरद पवार यांनी ही मागणी केली. कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, कोरोनासह विविध आजारांवर मात करण्यासाठी SII च्या लस निर्मितीवर सायरस पुनावाला यांनी भर दिला, त्यांच्या या मोलाच्या योगदानासाठी त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, "कोरोना संकटाच्या काळात संपूर्ण जगाला सीरमनं तयार केलेली लस देण्यात आली होती, विशेषत: आफ्रिकन देशांमध्ये जिथे लसीची नितांत गरज होती. सीरम इन्स्टिट्यूटनं ती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिली होती. ही लस वितरित करण्यात आली आणि त्यासाठी सायरस पूनावाला आणि त्यांच्या टीमनं लोकांच्या सेवेची जबाबदारी स्वीकारली."
सायरस पुनावाला यांना भारतरत्न द्यावा : शरद पवार
शरद पवार म्हणाले की, "लस निर्मितीच्या क्षेत्रातील त्यांचं योगदान फारच महत्त्वाचं आणि मोठं आहे. त्यांचं योगदान लक्षात घेऊन सरकारनं त्यांना पद्मभूषण पुरतं मर्यादित न ठेवता, त्यांना भारतरत्नही द्यावा, हीच माझी केंद्र सरकारकडून अपेक्षा आहे. भारतरत्न हा पुरस्कार सायरस पुनावाला यांना मिळावा."
शरद पवार म्हणाले की, जगभरातील प्रत्येक पाचपैकी तीन बालकांना सीरम लसीचा फायदा झाला. जागतिक स्तरावर लसीचा पुरवठा करण्यात एसआयआयनं बजावलेल्या भूमिकेचंही त्यांनी कौतुक केलं. विशेषत: गरीब देशांना लस पुरविण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या कार्याची प्रशंसा केली.
पूनावाला यांच्या कामाचं आणखी कौतुक व्हायला हवं : शरद पवार
पुनावाला यांना भारत सरकारनं दिलेल्या मान्यतेवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, पूनावाला यांना देण्यात आलेल्या पद्मभूषण पुरस्काराचं कौतुक होत असतानाच पूनावाला यांच्या योगदानाचं आणखी कौतुक होणं गरजेचं आहे, असं शरद पवार म्हणाले. जागतिक, राष्ट्रीय आणि मानवतावादी स्तरावर पूनावाला यांच्या कार्याचा सखोल आणि दूरगामी परिणामांवर जोर देऊन पवार यांनी केंद्र सरकारला त्यांच्या प्रस्तावावर गांभीर्यानं विचार करण्याचं आवाहन देखील केलं आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
"सायरस पुनवाला हे आगळवेगळं वव्यक्तिमत्व आहे. आम्ही एकत्र शिकलो काही गोष्टी इथं सांगता येणार नाहीत. आम्ही एका वर्गात होतो आम्ही अभ्यास किती करायचो त्यांना माहिती आहे आमचा निम्मा वेळ कॅन्टीन मध्ये जायचा. सिरम ही जगाची एक नंबरची इन्स्टिट्यूट आहे. जगाला खूप काही यांनी दिल आहे. कोरोना मध्ये एवढं संकट आले ,सगळे घरात बसले होते. देशाच्या नेतृवानं देखील सांगितलं बाहेर पडू नका, त्यावेळी यांनी लस काढली. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात लाखो रुपयांची लस त्यांनी मोफत दिल्या. भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण दिला आहे. सरकारला विंनती की, पद्मभूषण हा पुरस्कार देऊन सायरस पुनावला यांना सीमित ठेवू नका, सायरस पुनावाला यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, ही विनंती करतो."