(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : खरगेंकडे नेतृत्वपदाची जबाबदारी, नितीश कुमारांनी का नाही स्वीकारलं संयोजक पद? शरद पवारांनीच केलं स्पष्ट
Sharad Pawar : इंडिया आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांना आघाडीचे अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर शरद पवारांची प्रतिक्रिया समोर आलीये.
पुणे : इंडिया आघाडीचे नेतृत्व मल्लिकार्जुन खरगे (mallikarjun kharge) यांनी स्विकारावं अशी सूचना काही सहकार्यांनी केली, त्याला अनेकांनी संमती देखील दिली. त्याचप्रमाणे संयोजक म्हणून नितीश कुमारांनी (Nitish Kumar) जबाबदारी घ्यावी अशी सूचना करण्यात आली होती. परंतु संयोजक पदाची गरज नसल्याचं मत नितीश कुमारांनी मांडलं. त्यामुळे संयोजक पदाची नियुक्ती करण्यात आली नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) दिली.
एकविचाराने निवडणुकीला सामोरे जाण्याचा विचार असल्याचं शरद पवारांनी या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली. इंडिया आघाडीच्या बैठकीचं ऑनलाइन माध्यमातून आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये शरद पवार, ममता बॅनर्जी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी देखील हजेरी लावली. अवघ्या काही महिन्यांत लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती.
जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही - शरद पवार
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाच्या संदर्भात ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. परंतु या बैठकीत जागावाटपासंदर्भात काही निर्णय झाला नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं. जागावाटपाच्या संदर्भात काही वाद आहते, ते मिटवले जावे याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती शरद पवारांनी दिली. पुढे त्यांनी म्हटलं की, एकत्रित सभा घेण्यासाठी एक कमिटी स्थापन व्हावी अशा सूचना देखील अनेकांनी मांडल्या. आज देशाला पर्याय देण्यासाठी विविध राजकीय पक्ष सत्ताधा-यांच्या विरोध एकत्र येत आहेत. हिच इंडिया आघाडी जमेची बाजू आहे.
कुणालाचं तरी नाव पुढे करुन मत मागण्याची गरज नाही
इंडिया आघाडीमधून पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. यावर शरद पवारांनी म्हटलं की, कुणाचं तरी नाव प्रोजेक्ट करुन त्याच्या नावे मतं मागावी अशी गरज वाटत नाही. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही देशाला पर्याय देऊ शकतो. मोरारजी देसाई यांचे उदाहरण देत इंडिया आघाडीत सध्या तरी पंतप्रधान पदाचा चेहरा नसावा.
मला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार, पण... : शरद पवार
"अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, मला त्याचं आमंत्रण आलेलं नाही. मी म्हटलं काही हरकत नाही, पण मी जाणार. मात्र 22 जानेवारीला नाही जाणार, नंतर नक्की जाणार, श्रीराम हे सर्वांचे आहेत, असं शरद पवार म्हणाले आहेत.