Pune Arbaj Aslam Shaikh Autoriksha Post: सैराट फेम सल्याच्या फेसबुक पोस्टवर रिक्षाचालकाचं स्पष्टीकरण
सैराट फेम अभिनेता सल्या म्हणजेच अरबाज शेख यांनी पुण्यातील रिक्षा चालक पैशांची लुट करत आहेत, असा आरोप करत फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
Pune Arbaj Aslam Shaikh Autoriksha Post: सैराट फेम अभिनेता सल्या म्हणजेच अरबाज शेख यांनी पुण्यातील रिक्षा चालक पैशांची लुट करत आहेत, असा आरोप करत फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमुळे सध्या पुण्यातील रिक्षाचालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये वादावादी निर्माण झाली आहे. अरबाजला नांदेड सीटीपासून पुणे स्टेशनला जायचं होतं. त्यासाठी त्याने रॅपिडो या अॅपवरुन रिक्षा बुक केली. मात्र पुण्यातील पावसामुळे अनेक रस्ते बंद असल्याने रिक्षा दुसऱ्या रस्त्याने फिरवून न्यावी लागली. त्यासाठी रिक्षा चालकाने 60 रुपये जास्तीचे मागितले असं त्याने या पोस्ट मध्ये लिहिलं आहे. रिक्षा चालकाने शिवीगाळ केल्याचा आरोप देखील त्याने केला आहे.
त्यानंतर रिक्षा चालक असलेल्या असिफ मुल्ला यांना एबीपी माझाने गाठलं. त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी त्यांना शिवीगाळ केली नाही. त्यांना नांदेड सिटीपासून रिक्षात बसवले. रॅपिडो अॅपवर 198 रुपये सांगितले होते. मात्र अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते पुण्यातील बंद करण्यात आले होते. त्यामुळे रिक्षा फिरवून न्यावी लागली. त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली त्यानंतर मला फार मनस्ताप झाला. मी फोन बंद करुन ठेवला होता. माझ्या रिक्षात बसलेले ते व्यक्ती सिनेस्टार आहे हे मला पोस्ट व्हायरल झाल्यावर समजलं. त्यानंतर अनेकांनी मला देखील शीवीगाळ केली. वाट बघतोय रिक्षावाला संघटनेच्या काही सहकार्यांच्या मदतीने मी आज पुन्हा कामाला सुरुवात केली आहे, असं रिक्षाचालक असिफ मुल्ला यांनी स्पष्ट केलं.
या फेसबुक पोस्टमध्ये अरबाजने त्या रिक्षा वाल्याचं नाव आणि रिक्षाचा नंबर लिहिला होता. "रिक्षाचालकाने मला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने मला रस्त्यात उतरण्यासाठी सांगितलं. 6 ची ट्रेन असल्याने मी रिक्षातून उतरु शकत नव्हतो. मी कधीच ओला, उबर या अॅपवरुन रिक्षा बुक करत नाही. मला लवकर स्टेशनला पोहचायचं असल्याने मी रॅपिडो अॅपवरुन रिक्षा बुक केली होती. माझ्यासारख्या रोज पुण्यात राहणाऱ्या माणसांना हे करावं लागत असेल तर बाहेर गावातून पुण्यात फिरायला येणाऱ्या नागरिकांंचं काय होत असेल, याचा अंदाज मी घेऊ शकतो. त्यामुळे या रिक्षा वाल्यांची लूट कुठेतरी थांबायला हवी", अशी मागणी त्याने केली आहे