Pune Rain: पुण्यात पावसाचं धुमशान; जिल्ह्यातील धरणं ओव्हरफ्लो, पाण्याची चिंता मिटली
काल (11 सप्टेंबर) झालेल्या पावसानं आता पुण्यामधील काही धरणं 100 टक्के भरली आहेत.
Pune : पुणे (Pune) शहरात मुसळधार पाऊस झालाय. काल (12 सप्टेंबर) पावसामुळे पुण्यातील काही नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. त्यामुळे नागरिकांच्या घरातील सामानाचं नुकसान झालंय. रस्त्यावर देखील पाणी साचलं होतं. काल झालेल्या पावसानं आता पुण्यामधील काही धरणं 100 टक्के भरली आहेत.
पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली
पुणे जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे 100 टक्के भरली आहेत. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण हे 99.77 टक्के भरले आहे. काल झालेल्या पावसानं आता पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. पुणे जिल्ह्यातील 26 पैकी 13 धरणे 100 टक्के भरली आहेत. पुण्यात काल झालेल्या पावसामुळे पुन्हा उजनीच्या विसर्गात वाढ झाली आहे. काल 20 हजार क्यूसेक केलेला विसर्ग आज पुन्हा 30 हजार क्यूसेक झाला आहे.
नागरिकांच्या घरात शिरलं पाणी
मुसळधार पावसामुळे काल पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं. पावसामुळे कोथरुड भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. त्यामुळे घरातील सामानाचं नुकसान झालं. मुसळधार पावसानंतर पुण्यातील कोथरूड परिसरातील कुंबरे पार्क या सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. एका घराची भिंत पडलीय. लोक घरातील पाणी बाहेर काढत आहेत. आळंदी रस्त्यावरील दिघी येथे ढग फुटी झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाण पाणी आले आहे. पाण्याचा प्रवाह एवढा आहे की पूर आल्यासारखे दृश्य दिसत होते. रस्त्याच्या कडेला पार्कींग केलेली वाहने वाहून गेली आहेत. यात अनेक वाहनांचे नुकसान झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
वेदभवन, कोथरुड, वनाज जवळ कचरा डेपो, लमाण तांडा, पाषाण, सोमेश्वर वाडी, वानवडी, शितल पेट्रोल पंप, बी. टी. ईवडे रोड,कात्रज उद्यान या परिसरासह अनेक महत्वाच्या रस्त्यांवर पाणी साचलं होतं. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहत होते. रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूककोंडी देखील झाली होती. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांना अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागलं.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यभर पाऊस सुरू झालाय. पुण्यासह, औरंगाबाद, जळगाव, सातारा, कोल्हापूर, येथे मुसळधार पाऊस पडतोय. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलीत दवाजे उघडले आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :