Pune News : पुण्यातील तीन दिवसांचे 'सेक्स तंत्रा' शिबिर अखेर रद्द, कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी
शिक्षणाच्या माहेरघरात सुरु असलेल्या सेक्सच्या प्रशिक्षणाच्या कोर्समुळे सगळीकडून संताप व्यक्त होत आहे.पुण्यातील अनेक संस्था आणि पक्षांनी या प्रकरणावरुन पोलिसात धाव घेतली त्यानंतर हा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे.

पुणे : पुण्यात आयोजित (Pune News) होणार असलेला सेक्स तंत्रा (Sex Tantra) नावाचा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. पुण्यातील अनेक सामाजिक आणि धार्मिक आणि राजकीय संघटनांनी या कार्यक्रमाला विरोध केल्यानंतर पुणे पोलिसांनी या कार्यक्रमाच्या आयोजकांची चौकशी सुरु केली. त्यानंतर आयोजकांनी या कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यात गेले दोन दिवस सेक्स तंत्राची जाहिरात धुमाकूळ घालत आहे. येणाऱ्या नवरात्रात 1, 2 आणि 3 ऑक्टोबरला पुण्यामध्ये या सेक्स तंत्राचे आयोजन करण्यात आलं होतं. यात सहभागी होण्यासाठी प्रतिव्यक्ती पंधरा हजार रुपये फी आकारण्यात आली होती. त्यासाठी क्यू आर कोड आणि एक फोन नंबर देखील देण्यात आला होता. या जाहिरातीत वैदिक सेक्स तंत्रा, डिव्हाईन फेमिनाईन मॅस्क्युलाइन एंबॉडीमेंट, चक्र अॅक्टिव्हेशन, ओशो मेडिटेशन या कॅटेगिरीचा समावेश होता. पण या सेक्स तंत्राचा ओशोंच्या शिकवणुकीशी आणि तत्त्वज्ञानाशी कोणताही संबंध नाही असं ओशोंच्या अनुयायांच म्हणणे आहे.
भारतीय प्राचीन परंपरेत आणि प्राचीन ग्रंथात लैंगिक व्ययवहारांबाबत खुलेपणाने लिहण्यात आलं आहे. वात्सायन हा तर या परंपरेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे. मात्र भारतीय परंपरेतील पुरातन गोष्टींशी या सेक्स तंत्राचा कोणताही संबंध दिसून येत नाही, तसंच यातून लैंगिक शिक्षणही साध्य होणार नाही असं तज्ज्ञांचं म्हणणे आहे. तर या सेक्स तंत्राचा संबंध नवरात्रीशी जोडून तरुणाईला आकर्षित करण्याचा आयोजकांचा प्रयत्न होता. पण पुण्यातील विविध सामाजिक संघटनांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे धाव घेऊन हा कार्यक्रम रोखण्याची मागणी केली .
पुणे पोलिसांकडून या सेक्स तंत्राच्या आयोजकांचा शोध सुरु झाला. तेव्हा या सेक्स तंत्राचे आयोजन करणारे सत्यम, शिवम, सुंदरम फाऊंडेशन हे उत्तर प्रदेशातील असल्याचं आणि रवी सिंग हा त्याचा प्रमुख असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी इशारा देताच या रवी सिंगने हा कार्यक्रम रद्द करत असल्याचं सांगितले आहे. हा कार्यक्रम रद्द झाला असला तरी या कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. निव्वळ पैसे कमावण्यासाठी प्राचीन परंपरांचे असे विकृतीकरण होत असेल तर ते खपवून घेता कामा नये असा सर्वच क्षेत्रातून सूर उमटतोय.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
