MAHACARE : कर्करोगाच्या उपचारासाठी धोरण निश्चित, 'महाकेअर'च्या माध्यमातून राज्यातील 18 रुग्णालयांमध्ये दर्जेदार उपचार
MAHACARE Foundation : महाराष्ट्र सरकारने महाकेअर फाऊंडेशनची स्थापना करून राज्यभरातील 18 रुग्णालयांमध्ये दर्जेदार कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षणाची नवी सोय उपलब्ध करून दिली आहे.

मुंबई : राज्यातील कर्करोगग्रस्तांना दर्जेदार उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्वसमावेशक कर्करोग सेवा धोरण (Maharashtra Cancer Policy) निश्चित केले आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन (महाकेअर फाऊंडेशन – MAHACARE Foundation) स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या माध्यमातून राज्यभरातील 18 रुग्णालयांमध्ये विशेषोपचार सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या धोरणानुसार कर्करोग रुग्णालयांची एल-1, एल-2 आणि एल-3 अशी त्रिस्तरीय रचना करण्यात आली आहे. टाटा स्मारक रुग्णालय हे एल-1 स्तरावरील शिखर केंद्र असेल. एल-2 स्तरावर 8 केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत, ज्यात छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, नागपूर, मुंबईतील जे. जे. रुग्णालय, कोल्हापूर, पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेज तसेच नाशिक आणि अमरावतीतील सार्वजनिक आरोग्य विभागाची संदर्भ रुग्णालये यांचा समावेश आहे.
एल-3 स्तरावर अंबाजोगाई, नांदेड, यवतमाळ, सातारा, बारामती, जळगाव, रत्नागिरी, मुंबईतील कामा-अल्ब्लेस रुग्णालय आणि शिर्डी संस्थानचे रुग्णालय अशा 9 रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे.
Maharashtra Cancer Hospital List : कोणत्या रुग्णालयात कर्करोग उपचार मिळणार?
1. टाटा स्मारक रुग्णालय (एल-1)
2. छत्रपती संभाजीनगर (एल-2)
3. चंद्रपूर (एल-2)
4. नागपूर (एल-2)
5. मुंबई – जे. जे. रुग्णालय (एल-2)
6. कोल्हापूर (एल-2)
7. पुणे – बी.जे. मेडिकल कॉलेज (एल-2)
8. नाशिक – सार्वजनिक आरोग्य विभागाचे संदर्भ रुग्णालय (एल-2)
9. अमरावती – सार्वजनिक आरोग्य विभागाचे संदर्भ रुग्णालय (एल-2)
10. अंबाजोगाई (एल-3)
11. नांदेड (एल-3)
12. यवतमाळ (एल-3)
13. सातारा (एल-3)
14. बारामती (एल-3)
15. जळगाव (एल-3)
16. रत्नागिरी (एल-3)
17. मुंबई – कामा-अल्ब्लेस रुग्णालय (एल-3)
18. शिर्डी संस्थानचे रुग्णालय (एल-3)
या केंद्रांमध्ये रेडिओथेरपी, किमोथेरपी, शस्त्रक्रिया, पॅलेटिव्ह केअर, मानसिक आधार, औषधसुविधा तसेच संशोधन आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. एल-2 स्तरावरील रुग्णालयांमध्ये एमडी, एमएएस, डीएम-एमसीएच, डीएनबीसारख्या कोर्ससाठी फेलोशिप उपलब्ध होणार आहे.
महाकेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून या केंद्रांना निधी, मनुष्यबळ आणि आवश्यक मार्गदर्शन दिले जाणार असून समन्वयासाठी कमांड अँड कंट्रोल सेंटर स्थापन केले जाईल. सुरुवातीला फाऊंडेशनला 100 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कर्करोग रुग्णालयांना मिळणाऱ्या शुल्कापैकी 20 टक्के निधी या फाऊंडेशनकडे वर्ग करण्यात येईल. तसेच CSR, आंतरराष्ट्रीय संस्था आणि क्लिनिकल ट्रायल्सद्वारेही निधी उभारला जाणार आहे.
फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री, उपाध्यक्षपदी उपमुख्यमंत्री राहणार असून आरोग्य, वैद्यकीय शिक्षण व वित्त विभागाचे मंत्री, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि तज्ज्ञ मंडळींचा समावेश असणार आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि राष्ट्रीय रोग डेटा केंद्र (NCDIR) यांच्या अहवालानुसार 2025 पर्यंत राज्यातील कर्करोग रुग्णसंख्या 2020 च्या तुलनेत 11 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने हे धोरण राबवून राज्यातील कर्करोग उपचार व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवण्याचा संकल्प केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या






















