BLOG: शांतीचा दीपस्तंभ - गुरुदेव श्री श्री रविशंकर

गुरुदेव श्री श्री रविशंकर (Ravishankar) यांचं नाव घेतलं म्हणजे डोळ्यासमोर शांतता, करुणा आणि प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या एका व्यक्तिमत्वाचा चेहरा येतो. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य म्हणजे मानसिक अस्वस्थतेवरचं रामबाण औषध आहे असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. ते काही जादुगार नाहीत, पण का कोण जाणे, त्यांच्या नुसत्या दर्शन आणि सहवासाने आपल्यात संपूर्ण कायापालट झाल्यासारखे वाटते. त्यांच्याबाबतीतला एक प्रसंग मला आवर्जून इथे सांगावा वाटतो. २०१३ मध्ये दिल्लीच्या तिहार तुरुंगात सकाळी सहा वाजताची वेळ. एक अविस्मरणीय दृश्य होतं, ते म्हणजे पाच हजार कैदी शांतपणे बसून प्राणायाम करीत होते. वातावरण पूर्ण भारून गेलेलं होतं. फक्त श्वासांचे लयबद्ध आवाज येत होते. लोखंडी गज जणू असून नसल्यासारखे भासत होते. पोलीस, कैदी यांच्या आरडाओरड्याने एरव्ही दणाणून जाणारा हा तुरुंग जणू काही शांततेचा महासागर झाला होता. या साधनेने कैद्यांना स्वतःशी संवाद साधण्याची आणि आतून जोडण्याची संधी मिळाली. नवीन दिशा मिळाली.
राजेश नावाच्या एका कैद्याने अनुभव सांगितला, तो म्हणाला, “तुरुंगात असतानाच माझे आईवडील गेले. मी इतका खचून गेलो होतो की आत्महत्येचा विचारही केला. पण या कार्यक्रमानंतर मला जगण्यासाठी नवी उमेद मिळाली.” हा चमत्कार गुरुदेवांनी तिहारसारख्या तुरुंगात घडवून आणला होता. गुरुदेव नेहमी सांगतात,एखादी व्यक्ती गुन्हेगार का होते? कुठेतरी त्याला एक जखम झाली असते. त्या जखमी मनाला जर बरे केले, तर गुन्हेगारी नाहीशी होते.” आजपर्यंत जगभरातील थोडे थोडके नव्हे तर, आठ लाखांहून अधिक कैद्यांना त्यांच्या कार्यातून नवसंजीवनी मिळाली आहे.
पैगाम-ए-मोहब्बत – संवादाची ताकद
२०१७ मध्ये बेंगळुरूमध्ये गुरुदेवांनी ‘पैगाम-ए-मोहब्बत’ हा कार्यक्रम घेतला. या मंचावर सैनिकांच्या कुटुंबीयांपासून ते अतिरेक्यांच्या नातेवाईकांपर्यंत सर्वजण एकत्र आले. इतका आगळावेगळा कार्यक्रम यापूर्वी कधी झाला नसेल. सगळ्यांच्याच मानत दु:ख होतं. संवाद सुरु झाला आणि सगळं वातावरणाच बदललं. मानवी मुल्ये, माणुसकी काय आहेत ती कळली. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणताही राजकीय हेतू, अभिनिवेश न ठेवता केवळ माणुसकीच्या धर्माला जागवत हा कार्यक्रम करण्याचे गुरुदेवांनी ठरवले होते, साहजिकच त्याचा मोठा परिणाम झाला.
संवेदनशील
सगळ्यांना माहिती आहे, अयोध्येच्या राम मंदिर विवादासारख्या संवेदनशील प्रसंगी गुरुदेवांनी संयमाने सगळ्यांशी संवाद साधला. हिंदू समाजाची आस्था, मुस्लीम समाजाची भावना – दोन्ही समजून घेत त्यांनी विश्वासाचं वातावरण निर्माण केलं. ईशान्य भारतातही त्यांनी शांतीचा पूल बांधला. २०१५ मध्ये तब्बल ६७ बंडखोर गटांनी शांततेचा करार केला. गुरुदेवांच्या शिबिरानंतर शेकडो गुरिल्ला लढवय्यांनी शस्त्रं खाली ठेवली. आणि ते नव्या जीवनाकडे वळले. बंडखोरीचा त्याग केलेल्या एकाने सांगितलं की “गुरुदेवांच्या या विचाराने मला आयुष्याचा खरा अर्थ समजला.”
कोलंबियातील ऐतिहासिक करार
गुरुदेवांचे कार्य केवळ भारतापुरते मर्यादित नाही. कोलंबियामध्ये तब्बल ५३ वर्षे सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षात लाखो लोक मृत्यूमुखी पडले होते. सरकार आणि बंडखोरांमध्ये विश्वास उरला नव्हता. पण गुरुदेवांनी संवाद साधून बंडखोरांना एकतर्फी युद्धबंदी जाहीर करायला लावली. अखेर २०१६ मध्ये ऐतिहासिक शांतता करार घडून आला.
युद्धग्रस्तांना आधार – युक्रेनचा अनुभव
आज युक्रेनमध्ये युद्धामुळे हतबल झालेले लोक गुरुदेवांच्या स्वयंसेवकांच्या आधाराने हळूहळू आपल्या पायावर उभे राहत आहेत. साधा श्वासोश्वास कसा करावा हे तंत्र आता सैनिक आणि नागरिक दोघेही शिकताहेत. त्यामुळे कठीण परिस्थितीतही टिकून आहेत. एका सैनिकाला भीतीने अर्धांगवायू झाला होता, पण या साधनेमुळे तो पुन्हा चालू लागला.
छोटे बदल महत्वाचे
मोठे बदलच परिणामकारक असे नव्हे , तर छोटे छोटे बदल खूप काही घडवून आणतात. त्यामुळेच कैदी शांत झाले, बंडखोरांनी शस्त्रं टाकली, निर्वासितांना शांती मिळाली. अशा छोट्या छोट्या बदलांमधून जग बदलते हे आपण गुरुदेवांकडून शिकतो. आज इतकी वर्षे झाली. गुरुदेवांचे एक स्वप्न आहे – हिंसाचारविरहित जग. हे स्वप्न कदाचित स्वप्नवत आणि फारच आदर्शवादी वाटू शकतं, पण जेव्हा लाखो करोडो माने एकत्र येऊन या एकाच उद्देशाने विचार करू लागतील, तेव्हा हे स्वप्न सत्यात उतरू शकतं, असा विश्वास वाटू लागतो.
लेखक - विनायक पात्रुडकर

























