Pune Sex Tantra : सेक्स तंत्राचा कोर्स म्हणजे ओशोंना बदनाम करण्याचा प्रयत्न; पुण्यात सेक्स तंत्राच्या जाहिरातीवरुन वातावरण पेटलं
सेक्स तंत्रा यामधे उल्लेख असलेल्या ओशो मेडीटेशनचा ओशोंच्या शिकवणीशी कोणताही संबंध नाही, असं ओशोंच्या अनुयांयांनी म्हटलं आहे. ओशोंना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.
Pune Sex Tantra : शहरात सध्या सोशल मीडियावर (pune) शेअर होणाऱ्या एका जाहिरातीची जोरदार चर्चा होत आहे. यंदाच्या नवरात्रीच्या निमित्ताने 'सेक्स तंत्र' (Pune Sex Tantra Advertise) या नावाने तीन दिवसांचा एक कोर्स आयोजित करण्यात आल्याची ही जाहिरात आहे. 1, 2 आणि 3 ऑक्टोबर असे तीन दिवस पुण्यातील कॅम्प भागात हा कोर्स आयोजित करण्यात येणार असल्याचं या जाहिरातीमध्ये सांगण्यात आलं आहे. ही जाहिरात कोणी सोशल मीडियावर पसरवली याचा शोध पुणे सायबर पोलीस घेत आहेत.
ओशोचा काहीही संबंध नाही
या कोर्समधे वैदिक सेक्स तंत्र, डिव्हाईन फेमिनाईन मस्क्युलाईन एंबॉडीमेंट, चक्र अॅक्टिव्हेशन, ओशो मेडिटेशन या सगळ्या गोष्टींचा सामवेश आहे. या सगळ्या जाहिरातीमुळे सध्या पुण्यात संताप व्यक्त केला जातं आहे. यात ओशो मेडिटेशन असं एक सेशन असणार आहे. त्यात ओशो यांचं तंत्र शिकवण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र सेक्स तंत्र यामधे उल्लेख असलेल्या ओशो मेडिटेशनचा ओशोंच्या शिकवणीशी कोणताही संबंध नाही, असं ओशोंच्या अनुयायांनी म्हटलं आहे. ओशोंना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. तरुणांना चुकीची माहिती देण्याचं काम सुरु आहे. ओशोंनी आजपर्यंत अशा कोणत्याच सेक्स तंत्राची माहिती देणारा प्रयोग केला नाही आहे. विज्ञानाच्या आणि शारीरिक तंत्राची ओशो कायम अभ्यास करतात. त्यावर मत मांडतात. शिवशंकरांनी ध्यानाच्या अवस्था सांगितल्या होत्या त्यावर आधारित ओशो तंत्र आहे. त्यामुळे या सगळ्यांशी आमचा काहीही संबंध नाही, असं ओशोंच्या अनुयायांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर पोलिसांनी याबाबत कारवाई करण्याची मागणीही या अनुयायांनी केली आहे.
शिबिराच्या नावाखाली सेक्स रॅकेट
शिक्षणाच्या माहेरघरात सुरु असलेल्या सेक्सच्या प्रशिक्षणाच्या कोर्समुळे सगळीकडून संताप व्यक्त होत आहे. पुण्यातील अनेक संस्था आणि पक्षांनी या प्रकरणावरुन पोलिसात धाव घेतली आहे. पुण्यातील मनसे, ब्राह्मण महासंघ आणि इतर काही संस्था आक्रमक झाल्या आहेत. अनेकांनी यासंदर्भात त्यांचा विरोध दर्शवला आहे. लैंगिक प्रशिक्षणाच्या शिबिरावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. लैंगिक प्रशिक्षणाच्या शिबिराच्या नावाखाली सेक्स रॅकेट सक्रिय होऊ शकतो, अशी भीती सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली आहे.
आयोजकांना अगोदर चाबकाचे फटके द्या- रुपाली पाटील ठोंबरे
या शिबीराच्या आयोजकांना अगोदर चाबकाचे फटके मग कायद्याचे फटके मिळतील. हिंदूंचा पवित्र सण नवरात्री व पुण्यनगरीला बदनाम करण्याचे कारस्थान थांबवा. पुणे ही शिवजन्मभूमी आहे पुण्यात सेक्सतंत्र नावाचे पोस्टर सोशल माध्यमावर फिरत आहे. हा प्रथमदर्शनी ऑनलाइन पैसे लुटणाऱ्या टोळीचा फ्रॉड असू शकतो किंवा पुण्याला बदनाम करणाऱ्या सेक्सतंत्र आडून कुणी जर सेक्स रॅकेट चालवण्याचा प्रयत्न करणार असेल तर इथे थिल्लर पणा चालणार नाही. आयोजकांना पुणेरी इशारा आहे. आपण हा थिल्लरपणा तात्काळ थांबवावा, अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी घेतली आहे.