पुण्यात ट्रॅफिक जाममुळे महिलेचा मृत्यू? 17 तासांनंतर वडगाव शेरी चौकात पलटी झालेला टँकर बाजूला
Pune News : नगर रोडवरील टँकरमधून झालेल्या वायुगळतीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. अग्निशामन दल, पोलिस आणि प्रशासनाच्या कामगिरीमुळे पुण्यात मोठा धोका टळला आहे.
Pune News : नगर रोडवरील टँकरमधून झालेल्या वायुगळतीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. अग्निशामन दल, पोलिस आणि प्रशासनाच्या कामगिरीमुळे पुण्यात मोठा धोका टळला आहे. टँकर पलटी झाल्यामुळे वडगाव शेरी चौकात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालं होते. यामध्ये उपचारासाठी जाणाऱ्या एका 62 वर्षीय महिलेचं निधन झालेय.
पुणे अहमदनगर चौकात रस्त्याच्या मधोमध टँकर पलटी होऊन रस्त्यावर ज्वलनशील पदार्थ सांडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. ही वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली. मात्र, सकाळी कार्यालयाची वेळ असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या दरम्यान, एक 62 वर्षीय आजारी महिला उपचारासाठी कुटुंबीयांसोबत कारमधून रुग्णालयात जात होती. वाहतूक कोंडीमुळे त्या कारला वेळीच जागा मिळाली नाही. त्यामुळे महिलेला उपचारासाठी वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. त्यामुळे कारमध्येच त्या महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. वेळेवर महिलेला वाट मिळाली असती, वेळेवर उपचार मिळाले असते तर कदाचित महिलेचा जीव वाचला असता, अशा प्रतिक्रिया काही जणांच्या आल्या. ट्र्र्रॅफिक जाममध्ये उपचाराला जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारी मध्यरात्री 12.47 वाजता रस्त्यावर वडगाव शेरी चौकालगत एक गॅस असलेला टँकर पलटी झाला, त्यामधून मोठ्या प्रमाणात वायुगळती होत असल्याचे अग्निशमन दल नियंत्रण कक्षामध्ये समजले. त्याचवेळी घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे अग्निशमन दलाकडून मदत घटनास्थळी रवाना करण्यात आली. घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले असता, मोठ्या प्रमाणात अपघातग्रस्त टँकरमधून वायूगळती होत होती. त्याचवेळी माहिती घेतली असता सदर वायु हा इथिलीन ऑक्साइड असल्याचे समजताच हा वायू ज्वलनशील व धोकादायक असून हा पाण्यात विरघळणारा असल्याने यावर सेकंदाचा ही विलंब न करता पाण्याचा फवारा करत सदर टँकरवर आग वा स्फोट होऊ नये म्हणून सातत्याने चारही बाजूने पाणी मारण्याचे कार्य जवानांनी सुरू केले. त्याचवेळी आजूबाजूचे असणारे हॉटेल्स तसेच इतर इमारती व रहिवाशी यांना सतर्क करण्यात आले. पुणे महानगरपालिका अग्निशमन दल, पीएमआरडीए अग्निशमन दल व एमआयडीसी अशा एकुण १० वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. अग्निशमन दल प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या उपस्थितीमध्ये 06 अग्निशमन अधिकारी तसेच सुमारे 70 ते 80 जवानांनी कामगिरी चोख बजावली.
इथिलीन ऑक्साइड हा अत्यंत धोकादायक वायु घेऊन रिलायंस पेट्रोकैमिकल्स कंपनी, नागोठणे, मुंबई येथून उस्मानाबाद येथे बालाजी कंपनी येथे निघाला होता. तसेच हा टँकर बालाजी रोड सर्व्हिसेस ट्रान्सपोर्ट कंपनी यांच्या मालकीचा होता. राञी घटना घडल्यानंतर नियंत्रण कक्षामार्फत रिलायंस पेट्रोकैमिकल्स आणि बालाजी कंपनी यांना संपर्क साधून घटनेची माहिती देऊन ताबडतोब मदत पाठवण्यास सांगितले असता पहाटे सहाच्या सुमारास रिलायंस पेट्रोकैमिकल्सचे तज्ञ सेफ्टी ऑफिसर मिलिंद कुलकर्णी घटनास्थळी दाखल होऊन पुढे त्यांच्या पथकाने नायट्रोजन व क्रेनची मदत मागविली. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास भैरवनाथ कंपनीच्या पंधरा टनाच्या दोन क्रेन व नायट्रोजन (१५ सिलेंडर) असलेला टेम्पो दाखल होऊन टँकर उभा करण्याचे कार्य सुरू केले व पुढे तासाभरात क्रेनच्या साह्याने टॅंकर उभा केला व त्यानंतर नायट्रोजनच्या दाबाचा वापर करुन अपघातग्रस्त टँकरमधून वायु दुसरया टँकरमध्ये घेण्यात आला. यादरम्यान अग्निशमन दलाचे जवान धोका लक्षात घेऊन टँकरवर पाण्याचा मारा सातत्याने करीत होते. कारण जर यावेळी दुर्घटना घडली असती तर सदर परिसरात मोठी हानी झाली असती. या सर्व प्रक्रियेला सुमारे सोळा तासाचा अवधी लागला. सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पडल्यानंतर अग्निशमन दलाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले.