संतोष देशमुखांच्या लेकीची आर्त हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय व सर्व सामाजिक संघटनांच्यावतीने हा मोर्चा काढण्यात येत आहे.
पुणे : बीड जिल्ह्यातील सरंपच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या निर्घून हत्येच्या निषेधार्ह आणि देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी जनता रस्त्यावर उतरत असून आता पुण्यात जनआक्रोश मोर्चा निघणार आहे. यापूर्वी बीड आणि परभणी जिल्ह्यात संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा निषेध नोंदवत, आरोपींच्या फाशीची मागणी करत सर्वपक्षीय मोर्चा निघाला होता. या मोर्चाला माजी खसादार संभाजीराजे छत्रपती, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बंजरंग सोनवणे यांच्यासह बीड जिल्ह्यातली आमदार व सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. त्यावेळी, मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत फरार आरोपींना अटक करुन कडक शासन करावे, अशी मागणी मोर्चातील सहभागी नेत्यांनी व बांधवांनी केली होती. त्यानंतर, आता जिल्ह्याजिल्ह्यात मोर्चा काढण्यात येत असल्याचेही सांगण्यात येते. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सरकारला इशारा देत सर्वच जिल्ह्यात मराठे रस्त्यावर उतरतील, असे म्हटले होते. त्यातच, आता पुण्यात (Pune) जनआक्रोश मोर्चाची तारीख ठरली आहे.
पुण्यात 5 जानेवारीला जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय व सर्व सामाजिक संघटनांच्यावतीने हा मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात दिवंगत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हीदेखील सहभागी होणार आहे. माझ्या वडिलांची निर्घून हत्या झाली, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. या हत्येतील आरोपींना कठोरता कठोर शिक्षा द्यावी, आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी वैभवीने व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे. तसेच, 5 जानेवारी रोजी पुण्यात न्यायासाठी मोर्चा काढला जात आहे, आम्ही न्यायाच्या मागणीसाठी मोर्चात सहभागी होत असून तुम्हीही 5 जानेवारीला मोर्चात सहभागी व्हा, अशी हात जोडून विनंती संतोष देशमुख यांच्या लेकीने पुणेकरांना केली आहे.
पुण्यातील लाल महाल येथून हा मोर्चा निघणार असून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. राज्य सरकारने संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार आरोपींना अटक करुन, त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी मोर्चातील सहभागी बांधव, राजकीय पक्ष व संघटनांची आहे.
बीड,परभणी घटनेचा विशेष तपास
दरम्यान, बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणात सरकारने विशेष लक्ष घातलं आहे. बीडसाठी एसआयटी नेमण्यात आली असून सीआयडी व एसआयटीकडून बीडचा तपास सुरू आहे. तर, परभणीतील घटनेचाही विशेष तपास केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, या दोन्ही कुटुंबीयांची राज्यातील बड्या नेत्यांनी व मंत्र्यांनी भेट घेऊन सांत्वन केलं आहे.