Walmik Karad: वाल्मिक कराड अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीत होता, मंत्रिमंडळाच्या शपथविधीलाही हजेरी; बजरंग सोनावणेंचा सनसनटी आरोप
Bajrang Sonawane: बजरंग सोनावणे यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणात एक गंभीर आरोप केला आहे. वाल्मिक कराड हे अजित पवारांच्या गाड्यांच्या ताफ्यातून पोलीस ठाण्यात गेले.
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वेगवेगळ्या नेत्यांकडून दररोज नवनवे गौप्यस्फोट होताना दिसत आहेत. अशातच आता बीडचे खासदार बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांनी एक अत्यंत सनसनाटी दावा केला आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील एक आरोपी हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे मस्साजोग गावात आले होते तेव्हा त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यातील एका गाडीत होता. बजरंग सोनावणे यांच्या या वक्तव्याचा रोख वाल्मिक कराड यांच्या दिशेने असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता संतोष देशमुख हत्याप्रकरणातील धागेदोरे हे धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठ अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बजरंग सोनावणे यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात भाष्य केले.
यापूर्वी 28 मे रोजी जो गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हाच जर कारवाई झाली असती तर हे सगळं घडलं नसतं. पोलिसांनी वेळीच गुन्हा दाखल केला असता तर हे झाले नसते. आमच्या खंडणी गोळा करण्याच्या कामात जर अडथळा निर्माण केला तर काय होतं हे दाखवण्यासाठी संतोष देशमुख यांना अशा पद्धतीने मारण्यात आले. ज्या दिवशी हत्या झाली तेव्हा हा आरोपी परळीत होता. हत्या झाल्यानंतर आरोपी आणि पोलिसांची भेट झाली. त्यानंतर हा आरोपी एका नेत्याच्या फार्म हाऊसवर भेटला. यानंतर संबंधित आरोप महायुती सरकारच्या नागपूरमधील मंत्रिमंडळ विस्तार सोहळ्याला हजर होता. तेव्हाच त्याला अटक का करण्यात आली नाही, असा सवाल बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केला.
अजित पवार जेव्हा मस्साजोगला आले तेव्हा त्यांच्या ताफ्यात जी गाडी होती, त्याच गाडीतून हा आरोपी पोलिस स्टेशनला पोहोचला. पुण्यात आरोपी ज्या घरात थांबला त्याचा तपास व्हायला पाहिजे, अशी मागणीही बजरंग सोनावणे यांनी केली. या सर्वाची चौकशी झाली पाहिजे. जे शरण आले आहेत त्यांचा सीआयडीने तपास करावा. तीन गुन्ह्यांचा तपास एकत्र केल्याने निश्चितच काहीतरी आहे. तपासातून 'दूध का दूध, पानी का पानी' होईल. संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणे, ही आमची जबाबदारी आहे, असेही बजरंग सोनावणे यांनी म्हटले.
वाल्मिक कराड यांच्याविरोधात मी एकटा बोलत नाही, सुरेश धस, अभिमन्यू पवार, असे सगळेजण बोलतात, सर्वपक्षीय नेते बोलतात. या सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड तपासा. माझी एकच अपेक्षा आहे की, शरण आलेल्या आरोपीने व्हिडीओ ट्विट केला. तिन्ही गुन्हे क्लब केले, याचा अर्थ या सगळ्याचा संबंध असला पाहिजे. वाल्मिक कराड एवढे दिवस पुण्यात होते, तर सापडले का नाहीत, असा सवाल सोनावणे यांनी उपस्थित केला. याप्रकरणातील मास्टरमाईंड शोधून काढा.
आणखी वाचा