बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
विकास कामांचे सुयोग्य नियोजन व्हावे आणि त्यात सुसूत्रता असावी, यासाठी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पाला युनिक आयडी असावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रिमंडळ बैठकीसंदर्भात पत्रकारांना माहिती दिली. आमदार सुरेश धस हे माध्यमांशी संवाद साधत असतानाच देवेंद्र फडणवीस आले, त्यावेळी धस यांनी मागे होऊन मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, बीडची (beed) घटना, विरोधकांचे आरोप, मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय यासंदर्भात माहिती दिली. तसेच, पायाभूत सुविधांसाठी युनिक आयडी केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. आधार हा जसा एका व्यक्तीचा युनिक आयडी असतो, तसाच युनिक आयडी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी तयार करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अनेक विभाग एकाच ठिकाणी एकाच प्रकारची विकास कामे करतात. त्यातून तीच ती कामे होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. आधार क्रमांकामुळे जसे अनेक बोगस लाभार्थी आणि तीच ती नावे वगळली गेली, तसेच या निर्णयामुळे त्याच त्या विकास कामांची पुनरावृत्ती टाळता येणार आहे. यातून विकास कामांचे सुयोग्य नियोजन व्हावे आणि त्यात सुसूत्रता असावी, यासाठी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पाला युनिक आयडी असावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
ई-कॅबिनेटचा निर्णय होणार
राज्यातील प्रत्येकमहामंडळांवर 4 जणांच्या सचिवांची समिती नेमणार आहोत. तसेच, या बैठकीत राज्यात ई कॅबिनेट आपण सुरू केलंय, आपल्या फाईल्स कुठे आहेत त्याची माहिती ऑनलाईन मिळेल. हळूहळू पेपर कमी होऊन ईकॅबिनेटद्वारेच फाईल होतील. 'ई ऑफिस'च्या धर्तीवर 'ई-कॅबिनेट'चे सूतोवाच करण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाचा संपूर्ण मसुदा हा टॅबच्या माध्यमातून हाताळण्यात यावा, यातून कागदाची बचत होऊन पर्यावरण जपले जाईल, ही त्यामागची भावना आहे.
मंत्रालयात येणाऱ्या व्यक्तीचे आयडेंटीफिकेशन होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या कौतुकाचं सर्व श्रेय पोलिस व जिल्हा प्रशासनाला देतो. मंत्रालयामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने आलेला प्रत्येक माणूस आयडेंटीफाय झाला पाहिजे, त्या अनुषंगाने आपण निर्णय घेतोय. मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती मिळेल, तो कुठे किती वेळ होता तेही कळेल. मंत्रालयात दलाल फिरतात असं म्हणतात, आता या निर्णयामुळे हे दलाल कोण ते पाहू, असे म्हणत मंत्रालयात येण्यासाठी आता विशेष पास देण्यात येणार असून ते ऑनलाईनही दिले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, अबकारी करामुळे पडीक जमिनी जुन्या काळात कर न भरल्यामुळे सरकारने स्वत:कडे ठेऊन घेतल्या आहेत. आता त्या जमिनी क्लास वनमध्ये त्यांच्याच नावाने करता येतील.
5 पलंग मागवल्याबाबत मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
बीड हत्याकांडप्रकरणी मी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा केली आहे. ही केस त्यांच्याकडे घेण्यास त्यांनी होकार दिला तर दोन दिवसात नियुक्तीबाबत निर्णय घेऊ, असे म्हणत बीडच्या घटनेत उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याबाबत त्यांनी माहिती दिली. तर, विरोधक हे केवळ प्रसिद्धी मिळविण्याकरता बोलतात, त्यांना प्रसिद्धी हवी आहे. अधिकचे अधिकारी तपासासाठी बीडमध्ये आले आहेत, अधिकची कुमूक तिथं आहे, त्यांना काय रस्त्यावर झोपवणार? असा सवाल विचारत देवेंद्र फडणवीस यांनी बीड पोलिसांनी मागवलेल्या 5 पलंगांवरुन होणाऱ्या विरोधकांच्या टीकेला प्रत्त्युतर दिलं आहे. तसेच, ही वक्तव्ये फक्त प्रसिद्धीसाठी असल्याचेही ते म्हणाले.