(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray : पिंपरी-चिंचवडमध्ये राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल; भाषणातून जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेतून जातीय तेढ निर्माण केल्यामुळे राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहेत.
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या (Raj Thackeray) विरोधात पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेत जातीय तेढ निर्माण केल्यामुळे राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहेत. वाकड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाजीक रजाद सैय्यद असं तक्रार दाखल केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यात त्यांनी हिंदू-मुस्लिमांचा मुद्दा उपस्थित केला. भारताला धर्मांध लोक नको तर धर्माभिमानी लोक हवेत असं वक्तव्य केलं. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनी भाषणात भारतात कसा मुसलमान हवा हेदेखील सांगितलं. त्यांनी मुसलमानांनी केलेल्या अनाधिकृत बांधकामांवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या सगळ्या कारणावरुन हिंदू मुस्लिम असा तेढ निर्माण होईल आणि म्हणून गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी मुस्लिम बांधवांनी केली आहे.
मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यात कोणतेही वादंग होऊ नये, म्हणून खबरदारी घ्यावी असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. त्यासोबतच मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखवल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यांच्या भाषणावर आक्षेप घेतला आहे. राज ठाकरे यांनी भडकाऊ भाषण केले. त्यांच्या या भाषणामुळे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद निर्माण होऊ शकतात. त्यांच्या भाषणात अनेक मुस्लिम जनतेच्या भावनेला ठेच पोहचेल, असे शब्द वापरण्यात आले आहेत, असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
गुढीपाडवा सभेतील भाषण राजकीय दबावातून केलेले आहे. या भाषणांमुळे फक्त महाराष्ट्रात नाही तर राज्यभरात दंगे होऊ शकतात. राज्याच्या आणि देशाच्या संपत्तीचं मोठं नुकसान होऊ शकतं. भारताचा नाव लौकिक करणाऱ्या तरुणांचाही यात जीव जाऊ शकतो. त्यामुळे ही तक्रार दाखल करत असल्याचं तक्रारदाराचं म्हणणं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात याली आणि त्यांच्या पुढील सभांना परवानगी देऊ नये. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन मला न्याय द्यावा. त्याच प्रमाणे यानंतर माझ्या जीवाला धोका निर्माण झाल्यास त्याला राज ठाकरे जबाबदार असतील, असंही तक्रारदाराचं म्हणणं आहे.
माहीममध्ये अनाधिकृत मजार
मुंबईतील माहिमच्या समुद्रात अनधिकृत दर्ग्याचे बांधकाम सुरू असल्याचा दावा राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात केला. अनधिकृत बांधकाम एका महिन्यात न पाडल्यास त्याच्या बाजूला गणपती मंदिर उभे करू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. राज्यकर्ते, प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्यास काय होऊ शकते, हे लक्षात घ्या, असे आवाहन राज यांनी उपस्थितांना केले.