Neelam Gorhe: ... तर हे प्रकरणच घडलं नसतं; बीड प्रकरणावरील पत्रावरुन निलम गोऱ्हेंचा शरद पवारांना टोला
Neelam Gorhe: बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या मुद्द्यासंदर्भात भाष्य करत, बीडमधील याच गुंडांपासून लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही
कोल्हापूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राज्यात संताप व्यक्त होत असताना राजकारणही तापलं आहे. राज्याचे कॅबिनेटमंत्री आणि बीड प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे निकटवर्तीय असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात बीडमधील लोकप्रतिनिधी व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज राज्यपाल महोदयांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षप्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन बीडमधील घटना व त्याचा तपास याबाबत चर्चा केली. तत्पूर्वीच शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बीडमधील लोकप्रतिनीधींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे. आता, यासंदर्भात विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam gorhe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या मुद्द्यासंदर्भात भाष्य करत, बीडमधील याच गुंडांपासून लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंखे, यांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी शरद पवारांनी केली आहे. यासंदर्भात निलम गोऱ्हे यांना पत्र विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना त्यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.
निलम गोऱ्हेंचा शरद पवारांना टोला
बीड प्रकरणांमध्ये अनेक तक्रारी पुढे येत आहेत अनेकांच्या भावना देखील तीव्र झालेल्या असतात. जर आवश्यकता असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह विभाग यावर योग्य ती कारवाई करेल, असे निलम गोऱ्हे यांनी म्हटले. तसेच, शरद पवारांनी केलेल्या मागणीसंदर्भात बोलताना, हे त्यांनी आधीच केला असतं दोन वर्षांपूर्वी तर एकूणच हे प्रकरणच घडलं नसतं, अशी प्रतिक्रिया निलम गोऱ्हे यांनी दिली. निलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया देताना एकप्रकारे शरद पवारांना टोला लगावला.
सुजय विखेंचे कान टोचले
भिकारी हा शब्द शिवीसारखा आहे, तो कोणीच वापरू नये. कोणी कोणाकडे खासदारकी मागतं, त्याला भिकारी म्हणावं का? कोणी कोणाकडे अजून सहकार्य मागतं, त्याला भिकारी म्हणावं का?. मुळामध्ये अन्नदान आणि भीक यातील फरकच ज्या लोकांना कळत नाही ते सुसंस्कृत आणि आस्तिक आहेत असं मला वाटत नाही. त्यामुळे, त्यांची देवाबद्दलची श्रद्धा त्यांनाच लखलाभ होवो, असे म्हणत निलम गोऱ्हे यांनी सुजय विखेचे कान टोचले आहेत. तर, अन्नदानाच्या मागे प्रेरणा मोठी आहे, अन्नदानामध्ये भीक म्हणणं हे मला योग्य वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला