(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News : पतीच्या सततच्या टोमण्यांमुळे हृदयात ब्लॉकेज, महिलेची सासरच्यांविरोधात पोलिसात तक्रार
Pune News : पती आणि सासरच्या मंडळींच्या सततच्या टोमण्यांमुळे झालेल्या मानसिक त्रासातून हृदयात ब्लॉकेज झाल्याचा आरोप एका महिलेने केला आहे.
Pune News : पती (Husband) आणि सासरच्या मंडळींच्या सततच्या टोमण्यांमुळे (Taunts) झालेल्या मानसिक त्रासातून (Mental Stress) हृदयात ब्लॉकेज (Heart Blockage) झाल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. पुण्यातील (Pune) धनकवडी येथे हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी तिने सहकारनगर पोलीस ठाण्यात पती आणि सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली. महिलेच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा सगळा प्रकार जुलै 2021 ते मार्च 2023 दरम्यान घडल्याचं महिलेने म्हटलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
तक्रारदार महिला आणि प्रतीक चोथे यांचं 2021 मध्ये लग्न झाले होते. पुणे शहरातील धनकवडी इथे ही महिला राहते. परंतु लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच पतीसह सासरची मंडळी फिर्यादी महिलेला वारंवार हिणवून मानसिक त्रास देत होती. दोन वर्षांपासून आपला सतत मानसिक छळ करण्यात आला. या त्रासामुळे माझ्या हृदयात ब्लॉकेज आढळले आहेत, असा आरोप महिलेने पोलिसात केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.
पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात पती आणि सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरुन पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक चोथे, दिलीप चोथे, अंजली क्षीरसागर, वैशाली शिंदे, विद्या भगत, रुपाली तोडमल अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावं आहे.
पुण्यात गुन्हेगारीत वाढ
पुण्यात सध्या गुन्हेगारीत वाढ होत आहे. रोज नवे गुन्हे समोर येत आहे. त्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणातदेखील वाढ झाली आहे. लैंगिक अत्याचार, बलात्कारांच्या संख्येत आणि त्यासोबतच सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे ही गुन्हेगारी रोखणं सध्या पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
पती-पत्नीमधील वाद आणि टोकाचं कृत्य
पती आणि पत्नीमधील वाद काही नवे नाहीत. पत- पत्नीच्या संसारात अनेक वेळा छोट्याशा कारणांवरुन वादाचे प्रसंग घडत असतात. परंतु अशा वादात रागाच्या भरात उचललं पाऊल महागात पडल्याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. पत्नीने आवडती भाजी न बनवण्याने पतीने घरालाच आग लावल्याची घटना काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या उज्जैन शहरात घडला होता. तर मध्य प्रदेशातील आणखी एका घटनेत एक महिला आपल्या पतीसोबत सासरी जाण्यास नकार देत होती. यामुळे संतापलेल्या पतीने धारदार शस्त्राने थेट तिचे नाकच कापून टाकलं. यामुळे पत्नीला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.
हेही वाचा