MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
MSRTC : ई- बस पुरवणाऱ्या कंपनीने हलगर्जीपणा केल्याचं दिसून आल्यानंतर आता त्या कंपनीचे टेंडर रद्द करण्यासंबंधी हालचाली एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहेत.
मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) खासगी कंपनी Evey Trans ला दिलेल्या टेंडरच्या अटींच्या अनुषंगाने, गेल्या 12 महिन्यांत या कंपनीने दर महिन्याला 250 ई-बस पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यामुळे जवळपास 3000 बस MSRTC ला पुरवल्या जाणे अपेक्षित होते. मात्र कंपनीने हलगर्जीपणा करत आतापर्यंत फक्त 150 बसच MSRTC ला पुरवल्या आहेत असा आरोप करण्यात येतोय.
कंपनीच्या टेंडरच्या अटींचे उल्लंघन झाल्यामुळे MSRTC ने यापूर्वीच कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, MSRTC आता या कंपनीविरुद्ध कडक कारवाई करण्याचा विचार करत आहे. अलीकडेच झालेल्या MSRTCच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या कंपनीचा टेंडर रद्द करून नव्या कंपनीला करार देण्याबाबत चर्चा करण्यात आली. या प्रकरणावर MSRTCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लवकरच निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर आता एसटी महामंडळ अॅक्शन मोडमध्ये आलं असून त्या पार्श्वभूमीवर महामंडळाने एसटी कर्मचारी, व्यवस्थापन आणि बस पुरवणाऱ्या खासगी कंपन्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. खासगी कंपन्यांनी आणि ड्रायव्हरांनी एसटी महामंडळाचे नियम पाळले पाहिजेच अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशाराही महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिला आहे.
एसटी महामंडळाने दिलेल्या सूचना खालीलप्रमाणे,
1) बस इच्छित स्थळी सुखरूपपणे पोहोचवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे कोणत्याही प्रकारचा यांत्रिक बिघाड नसलेली सुस्थितीतील बस आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे सदर बस चालवणारा चालक. थोडक्यात सांगायचे तर बस आणि त्यावरचा चालक या दोघांचीही स्थिती अत्यंत निरोगी असणे गरजेचे आहे.
2) बसचा चालक योग्य प्रकारे प्रशिक्षित तर असला पाहिजेच परंतु त्याची शारीरिक प्रमाणेच मानसिक स्थिती देखील बस चालवण्यासाठी सक्षम असली पाहिजे. यामध्ये त्यांनी किती वेळ ड्युटी केली आहे, तो कोणत्या तणावात आहे का, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याची झोप पुरेशी झाली आहे का? हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.
3) अपघात झाला म्हणून चालकाला लगेच काढून टाका किंवा सर्विस वाईट आहे असे आम्हाला म्हणायचे नाही. परंतु महामंडळाकडून चालवल्या जाणाऱ्या बसेस यावर जनतेचा विश्वास आहे .अपघात हा शेवटी अपघात असतो. तो कोणी मुद्दाम करत नाही. हे जरी खरं असलं तरी देखील यामध्ये काळजी घेणं आवश्यक आहे आणि म्हणूनच एका एक्सीडेंट मध्ये तो ड्रायव्हर बाद आहे, त्याला पुन्हा वापरू नका असे आम्ही म्हणत नाही. परंतु चूक सुधारण्यास वाव दिला तर ती चूक सुधारू शकेल अशी व्यक्तीच तुम्ही नेमली पाहिजे. केवळ 20-20 तास, पंधरा-पंधरा तास काम करायला तयार आहेत म्हणून कमी पैशात मिळणारी माणसं ड्रायव्हर म्हणून वापरणे योग्य नाही. आपल्याला माणसांकडून काम करून घ्यायचे आहे केवळ यंत्रांकडून नाही हे समजून घेतलं पाहिजे.
4) जेव्हा महामंडळाच्या बसेसचे असे अपघात होतात तेव्हा आम्ही चालकाला तात्काळ ट्रेनिंगला पाठवतो. त्याच्यावर डिपार्टमेंटल ॲक्शन ही सुद्धा घेतो. त्याला शिक्षा दिली जाते.ते तसं तुमच्या ड्रायव्हरच्या बाबतीत होत नाही खाजगी ड्रायव्हर काही दिवस काम करतात किंवा तो दुसऱ्या एखाद्या ठिकाणी वापरला जातो. त्यामुळे त्याला सुधारण्याला वावच मिळत नाही.
5) ड्रायव्हरने रस्त्यावरच्या रहदारीकडे लक्ष दिले आहे का त्याचा स्पीड योग्य प्रकारे मेंटेन केलेला होता का तो भरधाव गाडी चालवतोय का रस्त्यावरून जाणारे येणारे लोकांकडे त्याचं लक्ष आहे का या सगळ्या बाबी महत्त्वाच्या आहेत. महामंडळ स्तरावर आम्ही सगळ्या सूचना प्रसारित करत असतो. परंतु या सूचना आमच्या लोकांना माहिती असतात. तुमच्या लोकांना याविषयीची माहिती नसते. बऱ्याचदा खाजगी चालक हे एसटी आपलं काही वेगळं होऊ शकत नाही अशा अविर्भावात लोकांना जुमानत नाहीत सूचनांचा पालन करत नाहीत. असं जर होत असेल तर याकडे संबंधित कंपनीने लक्ष दिलं पाहिजे.
6) प्रवाशांचा जीवाबरोबरच चालकाचा जीव ही तेवढाच महत्त्वाचा आहे हे देखील तितकंच लक्षात घेतलं पाहिजे. जरी आमची सहानुभूती असली तरी अख्ख्या महाराष्ट्रातील जनतेचा जो विश्वास आहे तो राखण्यासाठी या गोष्टीकडे खूप कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. जर जसा काळ बदलेल तसतसं अधिकाधिक खाजगी वाड्या गाड्या महामंडळाच्या ताफ्यामध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे तुम्ही आणि आम्ही मिळून प्रवासी सेवा द्यायची आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून महामंडळ जे काही नियम ड्रायव्हरच्या बाबतीत बसेसच्या बाबतीत लावते ते तुम्ही समजून घेऊन त्यानुसार आमच्या बरोबरीने काम करायची आणि आमच्या पद्धतीने काम करायचे तुमची तयारी असली पाहिजे.
7) महामंडळाच्या बसच्या कामकाजावर लक्ष ठेवणाऱ्या यंत्र अभियांत्रिकी खात्याने आणि वाहतुकीचे एकूण काम बघणाऱ्या वाहतूक खात्याने याबाबत सविस्तर सूचना तातडीने काढाव्यात. तसेच खाजगी वाहतूकदारांची वेळोवेळी बैठक घेऊन याबाबत चर्चा विचारविनिमय करून सूचना द्याव्यात.
8) अपघाताचे जे प्रमुख स्पॉट किंवा ठिकाण असतात मग ते मुंबईत असतील किंवा मुंबईच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी असतील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असतील प्रत्येक विभागाला त्याची कल्पना अ.सते ते सगळे वाहतूक खात्याने संकलित करा. एकमेकांसोबत ते शेअर करा आणि त्याच्यावर लवकरात लवकर खाजगी संस्थांनी बस पुरवठा करणाऱ्यांनी त्यांचं काय नियोजन आहे ते सादर करायचे. यामध्ये इम्प्रूमेंट नाही झाली तर मात्र नेमकं काय करायचं काही दंडात्मक कार्यवाही करायची का याबाबत वाहतूक खात्याचे आणि यंत्र अभियांत्रिकी खात्याचे जे काही नियोजन असेल जे काही विचार असतील ते त्यांनी अध्यक्षांना सादर करावे.
गाडीला स्पीड लिमिट करण्यासाठी स्पीड लॉक असला पाहिजे. त्याचा नीट वापर केला पाहिजे आजकाल व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम सुद्धा असते ती असली पाहिजे. गाडीमध्ये सीसीटीव्ही चालू स्थितीत जर असतील तर ह्या अशा घटनांवर प्रतिबंध करता येऊ शकेल. ड्रायव्हर मद्यपान वगैरे कोणत्या नशेच्या अमलाखाली गाडी चालवणार नाही स्पीड व्यवस्थित ठेवेल, नंतर काही दुर्दैवाने घडलं तर आपल्याकडे पुरावा राहू शकेल या गोष्टींचा पण योग्य विचार बस पुरवणाऱ्या कंपनीने केला पाहिजे.