(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime News : आईच ठरली वैरी! अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्या पोटच्या तीन वर्षीय चिमुकलीची प्रियकराच्या मदतीने हत्या
पुण्यात आईच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्या 3 वर्षीय चिमुकलीचा आई आणि तिच्या प्रियकराने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Pune Crime News : अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्या तीन वर्षीय चिमुकलीचा आई आणि तिच्या प्रियकराने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime News) समोर आला आहे. 2 मार्चला खडकी पोलिसांना तीन वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर तिचा गळा आवळून हत्या केल्याचं शवविच्छेदनातून समोर आलं होतं. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरु केला आणि अखेर पोलिसांना या चिमुकलीच्या हत्येचा उलगडा करण्यात यश आलं. या चिमुरडीची हत्या आई आणि तिच्या प्रियकराने गळा आवळून केल्याचं पोलीस तापासात समोर आलं आहे.
या प्रकरणी आई आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. संतोष देवमन जामनिक (वय 25) आणि लक्ष्मी संतोष गवई (वय 26, दोघे रा. खेरपुडी, ता. बाळापूर, जि. अकोला) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. खडकी रेल्वे स्टेशन ते खडकी बाजार रोडच्या दरम्यान सीएफडी मैदानाजवळ तीन वर्षाच्या चिमुकलीचा 2 मार्च रोजी दुपारी मृतदेह आढळून आला होता. गळा दाबून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला. खडकी पोलिसांबरोबरच गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत होती.
जॅकेटवरच्या नावावरुन उलगडा
संतोष आणि लक्ष्मी हे दोघे एकाच गावातील राहणारे असून त्यांच्यात अनैतिक संबंध आहेत. संतोष खडकीतील एका कंस्ट्रक्शन साईटवर राहतो. लक्ष्मी संतोषकडे लहान मुलीला घेऊन आली होती. लक्ष्मीला तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यातील सर्वात लहान मुलीला घेऊन ती पुण्यात आली. दोघांमध्ये भांडण झालं. त्यानंतर दोघांनीही चिमुरडीला पट्ट्याने मारहाण केली आणि तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर दोघेही खडकी स्टेशन रोडवर आले. चिमुरडीला फेकून दिलं आणि पळून गेले. या सगळ्या प्रकाराचे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यावर आरोपीने घातलेल्या जॅकेटमुळे आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आलं. आरोपीने घातलेल्या जॅकेटवर संघर्ष ग्रुप, खेरपुडी असं लिहिलं होतं. त्यावरुन शोध घेताना ते गाव अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्याविषयी माहिती काढली. गावातील नागरिकांशी संपर्क केला असता दोघांच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला आणि दोघांना ताब्यात घेतलं.