बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
साताऱ्यातील लाच प्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायाधिशांचा जामीन अर्ज सातारा जिल्हा न्यायालयाने आज फेटाळला.
सातारा : आरोपीस जामीन मिळवून देण्यासाठी चक्क न्यायाधीशांनीच लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यातून समोर आला होता. विशेष म्हणजे एसीबीने रंगेहात पकडल्याने हा भांडाफोड झाला. साताऱ्यातील सत्र न्यायालय परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये न्यायाधीश (Judge) महोदयांसह आणखी तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना ताब्यात घेतलं होतं. त्यामध्ये, चक्क न्यायाधीश महोदयांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपींच्या जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला असता, सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने (Court) आरोपी न्यायाधीश महोदयांचा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे, लाच घेणाऱ्या न्यायाधीश महोदयांना न्यायालयानेच फटकारल्याचं दिसून आलं.
साताऱ्यातील लाच प्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायाधिशांचा जामीन अर्ज सातारा जिल्हा न्यायालयाने आज फेटाळला. 5 लाख रुपयांच्या लाचप्रकरणी जाळ्यात अडकलेले धनंजय निकम यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. त्यावेळी, न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार देत त्यांचा अर्ज फेटाळून लावला. सातारा लाच लुचपत अधिकाऱ्यांनी सापळा रचून न्यायाधीश निकम यांच्यासह चौघांना रंगेहात पकडले होते. त्यानंतर, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. एका खटल्यातील संशयीत आरोपीला जामीन देण्यासाठी न्यायाधिशांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. त्याबद्दल तक्रारदाराच्या माहितीवरुन लाच लुचपत विभागाने छापा मारत ही कारवाई केली होती.
सर्वसामान्यांच्या न्याय-हक्काचे ठिकाण म्हणून न्यायालयाकडे पाहिले जाते. पोलिसांकडून अन्याय झाल्यानंतरही न्यायालयात आपण पाहू, न्यायालयात आपणास न्याय मिळेल, अशी भावना सर्वसामान्यांची असते. मात्र, न्यायाधीश महोदयच लाच घेताना रंगेहात पकडल्यामुळे न्यायपालिकेवरही शंका उपस्थित झाली. तसेच, न्यायालयाच्या कामकाजाला धक्का पोहोचवण्याचं काम न्या. निकम यांच्या कृत्याने केलं. मात्र, त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने अर्ज फेटाळला आहे.
पुणे-सातारा विभागाची मोठी कारवाई
11 डिसेंबर रोजी पुणे-सातारा अँटी करप्शन विभागाने संयुक्तिकपणे साताऱ्यात मोठी कारवाई केली होती. सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश महोदयांविरुद्धच गुन्हा दाखल झाला. जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले, त्यानंतर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करण्यात आली. एका खटल्यात आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. या प्रकरणात न्यायाधीश महोदयांसह तीघांना रंगेहात पकडल्याने न्यायपालिका क्षेत्रात खळबळ उडाली होती.
हेही वाचा
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली