Accident : जुना मुंबई-पुणे महामार्ग अपघात, मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार : मुख्यमंत्री
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील (Old Pune-Mumbai highway) खासगी बस अपघातात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जाहीर केली आहे.
![Accident : जुना मुंबई-पुणे महामार्ग अपघात, मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार : मुख्यमंत्री Pune-Mumbai highway accident cm eknath shinde has announced financial assistance of 5 lakh each to the family Accident : जुना मुंबई-पुणे महामार्ग अपघात, मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार : मुख्यमंत्री](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/b96d7849ba270e1e61298b6b7cc285521664712520153555_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Accident : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील (Old Pune-Mumbai highway) खासगी बस अपघाताबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
तात्काळ वैद्यकीय उपचार पुरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून आज पहाटे भीषण अपघात झाला. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अपघातानंतर तातडीने मदतकार्यात सहभागी झालेल्या हायकर्स आणि आयआरबी टीममधील तरुणांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. या संकटसमयी मदतकार्यात तातडीने धावून आल्याबद्दल या टीमच्या सदस्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
अपघातात 12 ते 13 जणांचा मृत्यू
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात 12 ते 13 जणांचा मृत्यू झाला आहे. ही बस पुण्याहून मुंबईला निघाली होती, तेव्हा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यामध्ये 25 प्रवासी जखमी झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
Accident News : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळली, 12 ते 13 जणांचा मृत्यू
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)