Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
MPSC Success Story : अहिल्यानगरमधील उखलगाव या गावातील तब्बल 15 मुलं स्पर्धा परीक्षेतून अधिकारी झाले आहेत. त्यामध्ये एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावांचा समावेश आहे.

अहिल्यानगर : ग्रामीण भागातील (Rural Maharashtra) विद्यार्थ्यांच्या जिद्दीला सलाम करणारी एक हृदयस्पर्शी यशोगाथा (Success Story) अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातून समोर आली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव (Ukhalgaon) येथील चंदन कुटुंबातील तीन सख्ख्या भावांनी एमपीएससी परीक्षा (MPSC Exam) उत्तीर्ण करत प्रशासकीय सेवेत स्थान मिळवले, जे महाराष्ट्रातील दुर्मिळ उदाहरण मानले जात आहे.
दुर्गम गावातून थेट अधिकारीपदापर्यंतचा प्रवास (MPSC Success Story)
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, दुर्गम भागात राहूनही अजय चंदन (Ajay Chandan) यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या संयुक्त गट-ब 2024 परीक्षेत यश मिळवत राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector STI) पदाला गवसणी घातली आहे. जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतलेल्या अजय यांचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
दोन भाऊ आधीच सेवेत; तिसऱ्याने पूर्ण केले स्वप्न (Three Brothers In MPSC Service)
चंदन कुटुंबातील मोठे भाऊ दिलीप मालन चंदन हे सध्या नागपूर गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर दुसरे भाऊ विजय मालन चंदन हे पुणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. विशेष म्हणजे दोघेही सुरुवातीला शिक्षक होते, मात्र MPSC परीक्षेच्या माध्यमातून मोठे ध्येय गाठण्याचा निर्धार त्यांनी केला आणि यश मिळवले.
Ukhalgaon News : आईचा संघर्ष, भावांचा आदर्श आणि चिकाटीचा विजय
अजय चंदन यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उखलगाव येथून घेतले. तर पुढे पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून समाजशास्त्र विषयात पदवी पूर्ण केली. दोन मोठ्या भावांचा आदर्श, आईचा संघर्ष आणि स्वतःची जिद्द याच्या बळावर त्यांनी MPSC चा ध्यास पूर्ण केला.
गावासाठीही प्रेरणा; 15 मुलं अधिकारी (MPSC Youth Inspiration)
दिलीप चंदन अधिकारी झाल्यानंतर त्यांच्या प्रेरणेतून उखलगावमधील जवळपास 15 तरुणांनी MPSC परीक्षा उत्तीर्ण केल्याचे ग्रामस्थ सांगतात. केवळ स्वतःपुरते यश न ठेवता, गावातील इतर विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याचे कार्य हे तिघे सख्खे भाऊ करत आहेत.
या यशाबाबत अजय चंदन म्हणतात, “या यशामागे माझी आई, भाऊ, कुटुंबीय आणि मित्रांचा मोठा वाटा आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी सातत्य, जिद्द, चिकाटी आणि योग्य नियोजन अत्यंत आवश्यक आहे.”
ग्रामीण भागातून आलेल्या या तीन सख्ख्या भावांची MPSC यशोगाथा आज संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे.























