Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरातील महावीर नगर परिसरात पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. जन्मदात्या मुलानंच आपल्या वृद्ध आई-वडिलांचा निघृणपणे खून केला विजयमाला नारायण भोसले (वय ७०) आणि नारायण गणपतराव भोसले (वय ७८) या वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर संशयित मुलगा सुनील (वय 48) स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सुनिल नारायण भोसले (वय 48) याला ताब्यात घेतले आहे.
आईच्या हाताची नस कापली, वडिलांच्या डोक्यात काठीने वार
प्राथमिक तपासात संशयित सुनीलने अत्यंत थंड रक्ताने खून केल्याचे समोर येत आहे. आई विजयमाला यांच्या हाताची नस काचेसारख्या धारधार वस्तूने कापली. चेहऱ्यावर काचेच्या तुकड्याने वर्मी घाव घातले. वडील नारायण भोसले यांच्या डोक्यात काठीने वार केला. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. खूनामागे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कौटुंबिक वाद, मानसिक तणाव किंवा अन्य कोणते कारण आहे का, याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच हुपरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक एन. आर. चौखंडे, सहाय्यक निरीक्षक विक्रम शिंदे यांच्यासह पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक लॅबचे पथकही घटनास्थळी पोहोचून पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण हुपरी शहरात हळहळ व्यक्त होत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदनानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येणार आहे.























