(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Fire : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी, मृतांच्या नातेवाईकाचं सांत्वन
चौकशीचा प्राथमिक अहवाल प्राप्त होताच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल, व आगीच्या चौकशी अहवालानंतर जबाबदारी निश्चित होईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
पुणे : पुण्यातील घोटावडे फाटा येथील कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी, मृतांच्या नातेवाईकाचं सांत्वन केलं.
मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आग कशामुळे लागली, याला जबाबदार कोण यासाठीच्या चौकशीसाठी शासनाने समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त होईल. चौकशीचा प्राथमिक अहवाल प्राप्त होताच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल, व आगीच्या चौकशी अहवालानंतर जबाबदारी निश्चित होईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
या उद्योगात अनेक गोष्टी ज्वलनशील असल्याने आग सगळीकडे पसरली असून आगीचे कारण, जबाबदार कोण याबाबतची कारवाई, अहवाल आल्यानंतर होईल. प्राथमिक अहवाल आजच प्राप्त होईल. डीएनए टेस्ट करूनच मृतदेह ओळखता येतील त्याशिवाय ओळखता येणार नाहीत, यासाठी ससूनमध्ये दोन ते तीन दिवस लागू शकतात.
खासदार सुप्रिया सुळे यांनीही रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच शासकीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
कंपनी मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
आग दुर्घटनेची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली असून आगीच्या दुर्घटनेस कंपनी मालक जबाबदार असल्याचं समोर आलं आहे. एसव्हीएस या कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी संपुर्ण घटनेची प्राथमिक चौकशी केली आहे. प्राथमिक चौकशीत कंपनीच्या मालकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ याप्रकरणाचा तपास करत आहेत.
Pune Fire : आग लागली तेव्हा सर्वजण आपला जीव वाचवून पळत होते; प्रत्यक्षदर्शी सुरक्षा रक्षकाची माहिती
मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत
आग दुर्घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. तर पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. जखमी व्यक्तींना 50,000 रुपये भरपाई देण्यात येणार आहे.