Pune Crime News: कर्नाटकातील टॉपर इंजिनियरनं पुण्यातल्या सोन्याच्या दुकानात मारला डल्ला; बाथरुमच्या खिडकीतून आत शिरला, काच लागली अन्.., 250 सीसीटीव्ही पाहून पोलिसांनी कर्नाटक गाठलं
Pune Crime News: कर्नाटकातील शासकिय अभियांत्रिकीचा विद्यार्थ्यानं पुण्यातील बुधवार पेठेतील ज्वेलरी शॉपमध्ये डाका टाकला आहे, बाथरुमच्या खिडकीतून शिरुन बुधवार पेठेतील ज्वेलर्समध्ये चोरी केली.

पुणे : पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात एका ज्वेलरी शॉपमधून दागिने आणि ऐवज चोरीला गेल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून या प्रकरणी एकाला अटक केली आहे, पुण्यात चोरी करणाऱ्या आरोपीला कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातून अटक केली आहे. विशेष बाब म्हणाजे आरोपी हा सराईत गुन्हेगार नसून, तो अभियांत्रिकीचा टॉपर असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. लिखित जी (21, रा. कोलार, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे.
4 लाख 74 हजार रुपयांचं सोनं चोरलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पाऊण ते सव्वा वाजेदरम्यान, एका 20 ते 25 वर्षीय तरुणाने दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बाथरूमच्या खिडकीतून ज्वेलरी शॉपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्याने 4 लाख 74 हजार रुपयांचं सोनं आणि ऐवज चोरून नेला होता. चोरी करताना आरोपीने पांढऱ्या रंगाचा शर्ट, जीन्स पँट आणि काळ्या रंगाचा मास्क घातला होता. त्याच्या पाठीवर एक बॅग असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होते. दुकानमालकाला दुसऱ्या दिवशी ही बाब समजल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दिली होती.
हाताला बाथरुमची काच लागली त्यामुळे..
त्या आरोपीने कर्नाटकातून पुण्यात येऊन रेकी केली आणि नंतर बुधवार पेठेतील एका सोन्याच्या दुकानात चोरी केलेल्या इंजिनिअरींगच्या टॉपरला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. बुधवार पेठेतील एका सोन्याच्या दुकानात डाका टाकायचा आणि बाईक आणि कार घ्यायचा त्याचा प्लॅन होता, मात्र हा प्लॅन फसला. 6 जुलैला रात्री ही घटना घडली. या चोराने चोरी केली. मात्र चोरी करुन बाहेर निघताना त्याच्या हाताला बाथरुमची काच लागली त्यामुळे त्याला जखम झाली. ज्वेलरीच्या दुकानात सगळीकडे रक्त पडलं. मालक सकाळी आल्यानंतर हे रक्त दिसलं आणि दुकानाची पाहणी केल्यास सोन्याचे दागिने लंपास केले. त्यामुळे मालकाने थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी 250 सीसीटीव्ही लावून अखेर त्याला कर्नाटकातील कोलार गावातून त्याला जेरबंद केलं.
हा विद्यार्थी तोंडाला कायम मास्क लावून सीसीटीव्हीमध्ये दिसत होता. त्यामुळे तोंडओळख करणं पोलिसांसाठी मोठं आव्हानात्मक होतं. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या बॅगचा माग काढला आणि बॅगच्या आधारे त्याचा तपास केला. चोरी करुन हा कर्नाटकात पळून गेला होता. कर्नाटकात गेल्यावर त्याने सोनं विकण्याचा प्रयत्न केला, मात्र हे सोनं एक ग्रॅमचं असल्याचं त्याला कळलं. पोलिसांच्या टीम विमानाने थेट कर्नाटकात या चोराचा शोध घेण्यासाठी गेली होती. त्यांनी लोकेशन ट्रेस करत, स्थानिकांकडून माहिती घेत या चोराला अखेर बेड्या ठोकल्या आहे.























