Baba Siddique Case: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील दोन आरोपींच्या निशाण्यावर होता पुण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा; आरोपपत्रात मोठा खुलासा
Baba Siddique Case: पुण्यातून अटक करण्यात आलेल्या रूपेश मोहोळ आणि गौरव अपुणे या दोन आरोपींनी फरार आरोपी शुभम लोणकरसह माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाच्या हत्येची पूर्ण तयारी केली होती.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique Case) यांच्या हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रात धक्कादायक बाब उघड झाली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पुण्यातून अटक केलेल्या दोन आरोपींच्या रडारवर निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा होता, अशी माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी (Baba Siddique Case) यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पुण्यातून अटक करण्यात आलेल्या रूपेश मोहोळ आणि गौरव अपुणे या दोन आरोपींनी फरार आरोपी शुभम लोणकरसह माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाच्या हत्येची पूर्ण तयारी केली होती. मात्र त्याआधीच गुन्हे शाखेने त्याला बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटक केली.(Baba Siddique Case)
गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपेश मोहोळ आणि गौरव अपुणे या दोन आरोपींना माजी अधिकाऱ्याच्या मुलाचा खून करायचा होता. कारण सप्टेंबर 2024 मध्ये पुण्यातील उत्तम नगर भागात त्यांचा जवळचा मित्र जयदीप ज्ञानेश्वर भोंडकर याच्या हत्येच्या कटात त्याचा सहभाग असल्याचा संशय होता. अटक आरोपी अमित सुदाम गुर्जर याला त्याने याच कटात मदत केली होती. या खुलाशानंतर मुंबई क्राईम ब्रँचने हे इनपुट पुण्याच्या उत्तम नगर पोलिसांशी शेअर केले आहे, जेणेकरून अधिकाऱ्याच्या मुलाला सुरक्षा पुरवली जावी. गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खुलासा करण्यात आला आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयदीप भोंडकरची हत्या आरोपी गुर्जर याने सप्टेंबर २०२४ मध्ये कोयत्याने वार करून केली होती. दोघेही एकमेकांना ओळखत होते आणि एकमेकांची चेष्टा करत असताना झालेल्या वादातून गुर्जरने भोंडकरची हत्या केली होती.आरोपी गुर्जरने मित्राला मदत करण्याच्या बहाण्याने भोंडकरला घराबाहेर बोलावून त्याची हत्या केली होती. या घटनेनंतर भोंडकरचे मित्र मोहोळ आणि अपुणे यांना असे वाटले की, माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने केवळ आरोपींना मदतच केली नाही तर कट रचण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती.
गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी नोंदवलेल्या जबाबात दोन्ही आरोपींनी माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाच्या हत्येचा कट रचल्याची कबुलीही दिली आहे. शुभमच्या मदतीने आपण शस्त्रे मिळवली होती, आणि त्याच शस्त्राने माजी अधिकाऱ्याच्या मुलाचीही हत्या करणार असल्याचे त्याने आपल्या जबाबात सांगितले आहे. तपासादरम्यान दोन्ही आरोपींकडून गुन्हे शाखेने दोन शस्त्रे आणि अनेक गोळ्या जप्त केल्या होत्या, ज्याचा वापर अधिकाऱ्याच्या मुलाच्या खुनासाठी करण्यात येणार होता. खून करण्यापूर्वी त्यांनी व त्यांच्या टोळीतील साथीदारांनी खडकवासला धरणाजवळ शस्त्रांचा सराव केला होता, असेही दोन्ही आरोपींनी जबाबात म्हटले आहे.