बीड जिल्ह्यामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे सरसकट बंदूक परवाना; सुरेश धस, अंजली दमानियांनी आवाज उठवताच एका दणक्यात 100 जणांचा परवाना रद्द!
बीड जिल्ह्यातील 232 जणांना नोटिसा धाडून चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. चौकशीत असमाधानकारक माहिती दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी 100 परवाने एका दणक्यात रद्द केले आहेत.
Gun licenses of 100 people cancelled in Beed : बीड जिल्ह्यात हवेत गोळीबार करणाऱ्या छपरींची संख्या पाहून बंदूक परवाना खिरापतीप्रमाणे वाटल्याची चर्चा रंगली होती. यामध्ये सराईतांकडे सुद्धा बंदूक परवाना दिसून आल्याने संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आमदार सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी मुद्दा चांगलाच लावून धरला होता. यानंतर आता बीड पोलिसांना जाग आली असून तब्बल 100 जणांचा परवाना रद्द केला आहे. जवळपास 250 जणांवर गुन्हा दाखल असताना राजरोसपणे बंदूका घेऊन फिरत होते.
परळीत हवेत गोळीबार करणाऱ्या तिघांचा परवाना रद्द
बीड जिल्ह्यातील 232 जणांना नोटिसा धाडून चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. चौकशीत असमाधानकारक माहिती दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी 100 परवाने एका दणक्यात रद्द केले आहेत. दरम्यान, परळीत हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास माणिक मुंडे आणि जयप्रकाश सोनवणेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिघांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात किती जणांकडे शस्त्र परवाना
बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 1 हजार 281 जणांकडे शस्त्र परवाना आहे. दरम्यान, परवाना देताना सर्व प्रकारची शहानिशा करूनच परवाना दिला जातो. यावेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी सुद्धा तपासली जाते. मात्र बीड जिल्ह्यामध्ये टपरी पोरं सुद्धा ज्या पद्धतीने बंदूक कमरेला लावून फिरत आहेत त्यावरून पोलिसांनी खेळण्यातील बंदूक दिल्याप्रमाणे परवाने दिले आहेत का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे.
परवाना देण्यामध्ये कोणाचे लागेबांधे नाहीत ना?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वाधिक आरोप होत असलेला आणि पवनचक्की प्रकरणातील आरोपी असलेला खंडणीखोर वाल्मिक कराडच्या मुलाकडे सुद्धा बंदूक असल्याचे फोटो दमानिया यांनी सोशल मीडियामध्ये पोस्ट केला होता. त्याच्याकडे परवाना नाही, पण कमरेला बंदूक दिसून येत होती. बीडमध्ये असे अवैध बंदूकधारी आहेत तरी किती? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. परवाना देण्यामध्ये कोणाचे लागेबांधे नाहीत ना? असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. जो जिल्हा मागास समजला जातो, पोट भरण्यासाठी ऊस तोड करण्यासाठी राज्यभर फिरावं लागतं त्या जिल्ह्यामध्ये गन कल्चर पाहून मात्र अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या