Kolhapur News : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
जेवणात विषारी औषध टाकत असताना आचारी सुद्धा समोर होता. त्यामुळे हे विष टाकलेलं जेवण कोणाचे पोटात गेलं नाही. मात्र, जेवणामध्ये विषारी औषध टाकत असतानाच मामा आणि आचाऱ्याची झटापट झाल्याची चर्चा आहे.
कोल्हापूर : भाचीने पळून जाऊन विवाह केल्याने संतापलेल्या मामाने भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात विष कालवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील उत्रे या गावी घडला. दरम्यान, हा प्रकार जेवण करणाऱ्या आचाऱ्यासमोर घडल्याने मोठा अनर्थ टळला. पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून आरोपी मामाचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. महेश ज्योतीराम पाटील असं भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात विष कालवणाऱ्या मामाचं नाव आहे.
थेट रिसेप्शनच्या जेवणामध्येमध्ये आचाऱ्यासमोर विष टाकले
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार महेश पाटीलच्या भाचीने एक आठवड्यापूर्वी गावातील एका मुलासोबत पळून जाऊन विवाह केला होता. त्यामुळे मर्जीविरोधात भाचीचा विवाह झाल्याने मामाचा पारा चांगलाच चढला होता. त्यामुळे भाचीने पळून जाऊन लग्न केल्याने आपली बदनामी झाली या रागातून मामाने थेट रिसेप्शनच्या जेवणामध्येमध्ये आचाऱ्यासमोर विष टाकले. जेवणात विषारी औषध टाकत असताना आचारी सुद्धा समोर होता. त्यामुळे हे विष टाकलेलं जेवण कोणाचे पोटात गेलं नाही. मात्र, जेवणामध्ये विषारी औषध टाकत असतानाच मामा आणि आचाऱ्याची चांगलीच झटापट झाल्याची चर्चा आहे. जेवणामध्ये विषारी औषध टाकून लोकांच्या जीवास धोका पोहोचवणारा प्रकार उघड झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षाच्या नावे फेक अकाउंटवरुन तरुणींशी गैरकृत्य
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांच्या नावाने इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट काढल्याप्रकरणी करनूर (ता. कागल) येथील एका तरुणाला मुरगूड पोलिसांनी अटक केली आहे. या अकाउंटवरून या तरुणाने अनेक तरुणींशी शीतल फराकटे यांच्या नावाने चॅटिंग करून गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला आहे. एका तरुणीच्या सजगतेने या भामट्याचा पर्दाफाश झाला. तोहिद शेख (वय 26, रा. करनूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांना एका तरुणीचा फोन आला होता. त्या तरुणीने तुम्ही दुसऱ्या तरुणाशी मला बोलावयास कसे सांगता असा जाब विचारताच फराकटे गोंधळल्या. त्यांनी त्या तरुणीची विचारपूस करून सर्व माहिती समजून घेतली. त्यानंतर शीतल फराकटे यांना आपले इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट असण्याची शंका आली. त्यानंतर शीतल फराकटे यांनी आपले कार्यकर्ते व कुटुंबीयांच्या मदतीने फेक अकाउंट उघडणाऱ्या तोहिद शेखची माहिती घेतली.
इतर महत्वाच्या बातम्या