(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे मैदानात, राष्ट्रवादीच्या नाना काटेंसाठी आज धनंजय मुंडे यांची जाहीर सभा
Pune Bypoll Election: चिंचवड मतदारसंघात मराठवाडा भागातील मतदार मोठ्या संख्येने असल्यानं मुंडे भाऊ-बहिणीची प्रचारात लढत पाहायला मिळत आहे.
पिंपरी चिंचवड : राजकारणामध्ये भाऊबंदकी नवी नाही. राजकारणामुळं अनेकांच्या घरांमध्ये दरी निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) देखील अनेक कुटुंबांमध्ये राजकारणामुळं दुरावा निर्माण झाला आहे. राजकीय संघर्षासाठी एकमेकांसमोर उभ्या राहिलेल्या मुंडे बहिण भावांच्या नात्याची कायमची चर्चा असते. पुण्यातील चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Pune Bypoll Election) मुंडे भाऊ बहिणीची लढत पाहायला मिळत आहे. भाजपच्या अश्विनी जगतापांसाठी काल पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जाहीर सभा घेतली होती. तर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना काटेंसाठी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) जाहीर सभा घेणार आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मांजी मंत्री नेते धनंजय मुंडे यांची चर्चा असते. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे सध्या वेगवेगळ्या राजकीय पक्षात आहेत. पंकजा मुंडे यांना भाजपनं राष्ट्रीय राजकारणाची जबाबदारी दिली आहे. तर, धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य पातळीवरील प्रमुख नेते आहेत. चिंचवड मतदारसंघात मराठवाडा भागातील मतदार मोठ्या संख्येने असल्यानं मुंडे भाऊ-बहिणीची प्रचारात लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे नाना काटे आणि अश्विनी जगताप यांच्यामध्ये कोण बाजी मारणार हे 2 मार्चच्या निकालावरुनच स्पष्ट होणार आहे.
विविध मुद्यांवरुन मुंडे बहिण भावांमध्ये संघर्ष
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात विविध मुद्यावरुन सातत्यानं संघर्ष होत आहे. दोन्ही नेते ऐकमेकांवर टीका करत आहे. त्यामुळं बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत आहे. राज्यात ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यावेळी धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी पंकजा मुंडे या सातत्यानं धनंजय मुंडे यांच्या कारभारावर टीका करत होत्या. धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्रीपदाच्या काळात बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाल्याची टीका देखील पंकजा मुंडे यांनी केली होती. तसेच बीडमध्ये भ्रष्टाचार इतका वाढला आहे की, प्रत्येक काम पैसा दिल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे सामान्यांची कामं रखडली जात असल्याची टीका देखील पंकजा मुंडे यांनी केली होती.
2019 ला धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा केला होता पराभव
दरवर्षी बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं. राज्यातील अत्यंत चुरशीची आणि सर्वांत लक्षवेधी लढत म्हणून या लढतीकडं पाहिलं जातं. या मतदारसंघात मुंडे-भावंडं आमने-सामने उभे ठाकतात. 2019 च्या विधानसबा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता. त्यावेळी धनंजय मुंडे हे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते होते. तर पंकजा मुंडे या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री होत्या. दोघेही चुलत भाऊ-बहीण असल्यानं या निवडणुकीला वेगळं महत्त्वं आलं होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :