Aishwarya Jagtap : लक्ष्मण जगतापांची लेक वाढदिवसाचं सेलिब्रेशन सोडून आईसोबत पदयात्रेत सहभागी; म्हणाली मीच...
Chinchwad Bypoll Election: लक्ष्मण जगताप यांची कन्या ऐश्वर्याचा आज वाढदिवस आणि याच दिवशी अश्विनी जगताप आयुष्यातील नवी वाटचाल सुरू करत आहेत.
Aishwarya Jagtap : दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini jagtap) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी पदयात्रा करत रवाना झाल्या आहेत. आजच लक्ष्मण जगताप यांची कन्या ऐश्वर्या जगताप हिचा वाढदिवस आहे आणि तीदेखील आई अश्विनी जगताप यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सहभागी झाली आहे. यावेळी ती म्हणाली की, माझ्या वडिलांसाठी मी लकी होते. त्यामुळे मी शेवटच्या श्वासापर्यंत आईवडिलांसाठी काम करत राहणार आहे.
लक्ष्मण जगताप यांची कन्या ऐश्वर्याचा आज वाढदिवस आणि याच दिवशी अश्विनी जगताप आयुष्यातील नवी वाटचाल सुरू करत आहेत. पहिल्यांदाच त्या निवडणुकीला सामोरं जात आहे. पतीच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर त्या राजकीय नशीब आजमावत आहे. या भावनिक क्षणी बर्थडे गर्ल ऐश्वर्या वाढदिवस बाजूला ठेऊन आईसोबत अर्ज भरायला निघाली आहे. यावेळी बोलताना ती म्हणाली की, मी वडिलांंसाठी लकी होते. त्यांना मुलगी हवी होती आणि 6 फेब्रुवारीला माझा जन्म झाला. आज ते नाहीत मात्र शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांच्यासाठीच काम करत राहणार आहे. वडिल असताना वाढदिवस सर्वांसोबत साजरा व्हायचा. दिवसाची सुरुवातच सगळ्यांच्या भेटीगाठी घेत आणि गरिबांना कपडे वाटून व्हायची. त्यामुळे फार मोठं सेलिब्रेशन नसायचं. सगळ्यांना आनंद देणं हीच त्यांची शिकवण होती. तीच शिकवण पुढे न्यायची आहे, असं ऐश्वर्या म्हणाली.
आज अश्विनी जगताप मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाल्या आहेत. यावेळी भाजपकडून मोठं शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. शेकडो भाजप कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले आहेत. शिवाय लक्ष्मण जगतापांचे समर्थकदेखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहे. अश्विनी जगताप या बचतगटाचं कार्य करतात. त्यामुळे बचत गटाच्या महिलादेखील मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. यावेळी बोलताना ऐश्वर्या म्हणाली की, वडिलांसाठी जशी मी लकी चार्म होते तशीच आईसाठीदेखील असेल.
लेकीचा वाढदिवस आणि आईची नवी वाटचाल
लेक ऐश्वर्यांच्या वाढदिवशीच अश्विनी जगताप यांच्या नव्या वाटचालीची सुरुवात होत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त जागेवर भाजपकडून अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी अश्विनी जगताप म्हणाल्या, आम्हाला कायम एक मुलगी हवी होती. त्याचवेळी ऐश्वर्याचा जन्म झाला. एकच मुलगी आहे आणि तीच सर्वस्व आहे. ऐश्वर्याने पदयात्रेत सहभागी होऊन मला साथ दिली आहे आणि नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहे, हे माझ्यासाठी मोठं गिफ्ट आहे, असंदेखील अश्विनी जगताप म्हणाल्या.