Pune Crime News: सात वर्षानंतर विद्यार्थिनीनी सांगितली लैंगिक छळाची घटना ; समुपदेशनाच्या वर्गातून माहिती समोर, आरोपीवर गुन्हा दाखल
पुण्यात सात वर्षांपूर्वी एका शाळकरी मुलीवर ओळखीच्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार केले होते. समुपदेशनासाठी शाळेत गेलेल्या महिला सामाजिक कार्यकर्त्याने संबंधित मुलीची चौकशी केली.
Pune Crime News: पुण्यात (Pune Crime) सात वर्षांपूर्वी एका शाळकरी मुलीवर ओळखीच्या व्यक्तीने लैंगिक (Rape) अत्याचार केले होते. समुपदेशनासाठी शाळेत गेलेल्या महिला सामाजिक कार्यकर्त्याने संबंधित मुलीची चौकशी केली. त्यानंतर तिने तिसरीत असताना सात वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पुणे पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
15 वर्षीय पीडित मुलगी शाळेत दहावीत शिकत आहे. शालेय विद्यार्थिनींना चांगल्या आणि वाईट स्पर्शांबाबत प्रबोधन करण्यासाठी समुपदेशन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी समुपदेशनासाठी आलेल्या महिला कार्यकर्त्यासमोर तरुणीने आपली व्यथा मांडली. पीडित मुलगी जेव्हा 3 ऱ्या वर्गात होती तेव्हा आरोपीने तिला घरी बोलावले ज्याबद्दल तिला जास्त माहिती नव्हती. त्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याची माहिती तिने चौकशीत दिली. त्यानंतर मुस्कान संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तिला धीर दिला.पीडित मुलीने नुकतीच उत्तम नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीवर अत्याचार करणारा संशयित आरोपीही त्यावेळी अल्पवयीन होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
यामुळे समुपदेशन गरजेचं
सध्या पुण्यात अनेक शाळांमध्ये शाळकरी मुलींसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या समुपदेशनाचा वर्ग घेतला जातो. त्यात अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. सायकोलॉजिस्ट किंवा इतर डॉक्टर प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसतात. या संवादातून विद्यार्थीनींना अनेक प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं. लैंगिकतेबाबत माहिती दिली जाते. त्यासोबतच गुड टच बॅड टच याची देखील उत्तम प्रकारे माहिती दिली जाते. यामुळे विद्यार्थिनींना लैंगिक छळाबाबत माहिती मिळते. कधी काळी त्यांच्यावर अशा पद्धतीने काही गैरवर्तन केलं का? ते तुमचे कोण होते? अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. या सगळ्यांचा शाळकरी मुलींना फायदा होत आहे आणि यातून रोज नवे प्रकरणं समोर येत असून त्या आरोपींवर गुन्हा देखील दाखल होत आहे.
...आणि विद्यार्थीनी उडघपणे बोलू लागल्या
या सनुपदेशनाच्या वर्गात प्रत्येक विद्यार्थीनींना व्यक्त होण्याची संधी दिली जाते. सगळ्यापुढे व्यक्त होण्यात अडचण येत असेल तर समुपदेशक वैयक्तिक त्या विद्यार्थीनीला भेटतात. या वर्गात विद्यार्थीनी त्यांच्यासोबत असा काही लैंगिक छळाचा प्रकार घडला होता का? या सगळ्या बाबत माहिती देतात. विद्यार्थीनींना लैंगिक शिक्षण दिल्यामुळे विद्यार्थीनी सजग होऊ लागल्या आहेत. त्या अनेक विषयांवर उघडपणे बोलत आहेत. त्यांच्यामुळे अनेक नराधमांना शिक्षादेखील होत आहे. ही समाजासाठी चांगली बाब आहे, असं मत समुपदेशकांनी व्यक्त केलं आहे.