दुर्देवी! दिंडीत पिकअप घुसला, तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू, 24 जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना
Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज सकाळी झाला.तेव्हा कान्हे फाटा येथे हा अपघात झाला.
Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज सकाळी झाला. खालापूर येथून ही पायी दिंडी आळंदीला निघाली होती. तेव्हा कान्हे फाटा येथे हा अपघात झाला. या वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप गाडी घुसल्याने 27 वारकरी चिरडले गेले. यात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अन्य जखमी वारकऱ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणाचा तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत. जखमींमध्ये बहुतांश महिला वारकरी दिसून येत आहेत.
खालापूरच्या उंबरगाव येथून ही दिंडी निघाली होती. माऊली चॅरिटेबल ट्रस्टची ही दिंडी आळंदीकडे पायी निघाली होती. कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी या दिंडीने प्रस्थान केले. कोरोनाच्या बिकट काळातील अनेक निर्बंध शिथिल झाल्यानंतर ते पहिल्यांदाच पायी वारी करत होते. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह होता. हातात भगव्या पताका आणि मुखात विठू माऊलीचा जप करत त्यांची दिंडी मावळ तालुक्यात पोहोचली होती.
कालचा मुक्काम संपवून आज पुन्हा आळंदीच्या दिशेने त्याच जोमाने ते मार्गस्थ झाले. पण सकाळी सातच्या सुमारास पिकअप गाडीने विघ्न आणले. बेदरकारपणे निघालेल्या पिकअप चालकाकडून गाडी थेट दिंडीत घुसली. पंधरा वीस वारकरी गाडी खाली आले. त्यामुळे वारकरी सैरावैरा धावले, नंतर नेमकं काय घडलं हे त्यांच्या लक्षात आलं.
मग जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी इतर वारकरी धावले. वडगाव मावळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं. त्यांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतलं आणि जखमी वारकऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या. लगतच्या खाजगी रुग्णालयांमध्ये जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत, पैकी दोन वारकऱ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अशी माहिती वडगाव मावळ पोलिसांनी दिली.
आळंदीत 2 डिसेंबरला संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे, तर दोन दिवस आधी कार्तिकी एकादशी साजरी केली जाते. तिथं पोहोचण्यासाठी ही दिंडी निघाली होती.