Torres Scam : पतीला गाफील ठेवलं, PF ची रक्कम टोरेसमध्ये गुंतवली, लकी ड्रॉमध्ये कार जिंकली, टोरेस गायब होताच महिलेला धक्का
Torres Scam : टोरेस कंपनीनं मुंबई, नवी मुंबई, मीरा रोड आणि कल्याण येथील लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. या संदर्भातील अनेक प्रकरणं समोर येत आहेत.
मुंबई : लाखो मुंबईकरांना टोरेस ज्वेलरी कंपनीनं हजारो कोटी रुपयांना गंडा घातला आहे. कंपनीनं मुंबई, नवी मुंबई, कल्याण परिसरात 6 कार्यालयं सुरु केली होती. या कार्यालयाच्या माध्यमातून लाखो मुंबईकरांची फसवणूक केली आहे. दादर, गिरगाव, कांदिवली, कल्याण, सानपाडा, मीरा रोड या सहा ठिकाणी शाखा आहेत. या ठिकाणची कार्यालयं बंद असून गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. गुंतवणूकदारांच्या अनेक कहाण्या आता समोर येत आहेत. त्यापैकी कल्याणमधील एका महिलेनं तिचा पती निवृत्त झाल्यानंतर मिळालेली पीएफची रक्कम टोरेसच्या पाँझी स्कीममध्ये गुंतवणूक केली. मात्र, सत्य समोर आल्यानंतर त्यांना धक्काच बसला आहे.
एका महिलेनं तिचा पती निवृत्त झाल्यानंतर मिळालेली पीएफची रक्कम टोरेसच्या स्कीममध्ये गुंतवली. विशेष बाब म्हणजे या बाबतची माहिती तिच्या पतीला देखील नव्हती. संबंधित महिलेला पतीला सरप्राइज द्यायचं होतं. महिलेचा पती क्लार्कची नोकरी करुन निवृत्त झाला होता. निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांच्या मदतीनं उच्चभ्रू सोसायटीमध्ये त्यांना घर खरेदी करायचं होतं. टोरेसनं आकर्षक ऑफर दिल्यांन संबंधित महिलेनं अडीच लाख रुपयांची गुंतवणूक केली. तिला दर आठवड्याला 11 टक्के परतावा देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. टोरेसच्या लकी ड्रॉमध्ये त्या महिलेनं कार देखील जिंकली होती. टोरेस कंपनी पसार झाल्यानंतर संबंधित महिलं आंधळेपणानं विश्वास ठेवला आणि त्यांच्या सल्ल्यानुसार गुंतवूणक केल्याचं म्हटलं. पतीनं मुलाच्या शिक्षणासाठी पैसे शिल्लक ठेवले होते. मात्र, सर्व काही गमावल्याची भावना तिनं व्यक्त केली. या संदर्भातील वृत्त एका इंग्रजी दैनिकात प्रकाशित झालं आहे.
सहा कार्यालयांना टाळं ठोकून कंपनी पसार
टोरेस ज्वेलरीची मालकी प्लॅटिनम हर्न प्रायवेट लिमिटेडकडे आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दादर येथील कार्यालयातून तिघांना अटक केली आहे. टोरेसच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना 44 टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. झटपट श्रीमंतीच्या नादात लाखो मुंबईकरांना शक्य त्या मार्गानं पैशांची उभारणी केली अन् कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. दादर, गिरगाव, कांदिवली, कल्याण, सानपाडा, मीरा रोड या सहा ठिकाणी टोरेसची कार्यालयं होती. ती कार्यालयं सध्या बंद आहेत. गुंतवणूकदारांचा रोष पाहता कार्यालयाबााहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, टोरेस प्रकरणी पोलीस दलानं चौकशी सुरु केली आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेनं देखील चौकशी सुरु केली आहे.
इतर बातम्या :