PunBypoll election : गिरीश बापट नाकात नळ्या, ऑक्सिजन सिलेंडर, व्हिल चेअरवर आले अन् मतदानाचा हक्क बजावला
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आले. नाकात नळ्या, ऑक्सिजन सिलेंडर, व्हिल चेअरवर येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
PunBypoll election : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आले. नाकात नळ्या, ऑक्सिजन सिलेंडर, व्हिल चेअरवर येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. गिरीश बापट (Girish Bapat) हे मागील काही दिवसांपासून आजारी असून ते उपचार घेत आहेत. आज संध्याकाळी पाचच्या सुमारास त्यांनी अहिल्यादेवी शाळेत मतदान केलं.
मागील चाळीस वर्ष गिरीश बापट यांचे कसब्यावर वर्चस्व आहे. त्यांनीच दिवंगत आमदार मुक्ता टिळकांना राजकारणात आणलं होतं. आज त्यांच्याच निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यामुळे त्यांनी कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी आजारी असतानाही प्रचारात उतरण्याचा निर्णय घेतला होता. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओखळला जातो. मात्र कसब्यात यंदा ब्राह्मणांना उमेदवारी न दिल्याने ब्राह्मण नाराज असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. त्यात महाविकास आघाडी कसब्यातील बंडखोरी रोखण्यात यशस्वी झाले होते. ब्राह्मणांच्या नाराजीचा मुद्दा समोर ठेवत हिंदू महासंघाने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढलं होतं. त्यानंतर ते कसब्यात प्रचारासाठी उतरले होते.
कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना गिरीश बापट म्हणाले होते, 1968 नंतर मी पहिल्यांदा निवडणुकीत सक्रिय नाही. अनेक निवडणुका आपला पक्ष लढला अनेक वेळा जिंकून अनेक वेळा हरलो. पण पक्ष संघटन राहिले. ही निवडणूक चुरशीची नाही, ही निवडणूक आपल्या चांगल्या मतांनी जिंकणार आहोत. कार्यकर्त्यांनी चांगलं काम करा, कर्यकर्ता पक्षाचा आत्मा आहे. असं ते म्हणाले होते. त्यानंतर भाजपचे अनेक नेते प्रचारासाठी मैदानात उतरले होते. अगदी शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील रोड शो केला होता.
पुणेकरांची मतदानाकडे पाठ
कसबा विधानसभा मतदार संघात पाच वाजेपर्यंत 45.25 टक्के मतदान पार पडलं तर चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी 41.1 मतदान पार पडलं. चिंचवडमध्ये सकाळी 7 ते 9 या वेळेत 3.52 टक्के, 9 ते 11 या वेळेत 10.45 टक्के. 11 ते 1 या वेळेत 20.68 तर 1 ते 3 या वेळेत 30.55 टक्के मतदान झाले आहे. कसबा पेठ मतदारसंघात सकाळी 7 ते 9 या वेळेत 6.5 टक्के, 9 ते 11 या वेळेत 8.25 टक्के. 11 ते 1 या वेळेत 18.50 तर 1 ते 3 या वेळेत 30.05 टक्के मतदान झाले होते. कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीचे मतदान सकाळपासूनच अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे पाहायला मिळालं