PM Modi in Pune : आधी भूमिपूजन व्हायचं मात्र उद्घाटन कधी होणार हे माहिती पडायचं नाही; मेट्रो लोकार्पणानंतर पंतप्रधानांचा टोला
PM Modi In Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रो लोकापर्ण सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात विविध मुद्यांवर भाष्य केले.
PM Modi In Pune : आधी भूमिपूजन व्हायचं मात्र उद्घाटन कधी होणार हे माहिती पडायचं नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रो लोकार्पणात लगावला. सध्याच्या काळात भूमिपूजन केल्यानंतर प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात हे दाखवले असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. समाजातील सर्वच घटकांनी आता मेट्रोचा वापर करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे लोकार्पण आणि इतर प्रकल्पांचा शुभारंभ, पायाभरणी कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, खासदार प्रकाश जावडेकर यांच्यासह पिंपरी-चिंचवडच्या महापौर व इतर नेतेदेखील उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, पुण्याच्या विकासात महत्त्वाच्या योगदान असणाऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन, भूमिपूजन करण्याची संधी आज मिळाली. पुणे मेट्रोचे भूमिपूजनासाठी आणि उद्घाटन करण्यासाठी मला आमंत्रित करण्यात आले यासाठी पुणेकरांचा आभारी आहे. याआधी भूमिपूजन होत असे पण प्रकल्प कधी पूर्ण व्हायचे हे कळायचे नाही. पण, आता भूमिपूजन केले जाऊ शकते आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात, हे सिद्ध झाले आहे.
येणाऱ्या काळामध्ये मेट्रो रेल्वेचे महत्त्व आणखी वाढणार आहे. देशभरात मेट्रोचे जाळं विस्तारत असून महाराष्ट्राचा मोठा वाटा असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. समाजातील सर्वच घटकांनी मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. मेट्रोतून प्रवास करणे शहराला एक प्रकारे मदत करण्यासारखे आहे. 21 व्या शतकातील शहरांच्या गरजा आणि विकास लक्षात घेऊन सरकार धोरण आखत आहे. सरकार अधिकाधिक ई-वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देत आहे. अत्याधुनिक पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रियेची व्यवस्था, बायोगॅस प्लांट, स्मार्ट एलईडी बल्बचा अधिक वापर व्हावा यासाठीच्या धोरणांवर सरकारकडून काम सुरू असल्याचेही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात नमूद केले.
विविध प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी
मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारणाची पायाभरणीही पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आली. नदीच्या 9 किमी पट्ट्यात 1080 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.
सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन झाले. पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली होती. एकूण 32.2 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12 किमी लांब मार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले आहे. हा संपूर्ण प्रकल्प 11,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधला जात आहे. पंतप्रधानांनी गरवारे मेट्रो स्थानकात प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पाहणी केले. त्यानंतर तिथून आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला.