Vande Bharat : मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला 'दौंड'ला थांबा नाही, 'या' गावांवरही अन्याय
एक्स्प्रेसचा थांबा दौंडमध्ये देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.मात्र दौंडबरोबरच या मार्गावरील महत्वाच्या गावातही थांबा देण्यात आला नाही आहे.
Mumbai-Solapur VandeBharat Train Stop : मुंबईहून सोलापूरला (Vande Bharat Express) जाणारी वंदे भारत एक्स्प्रेसची सगळ्यांनाच आतुरता आहे. मात्र या मार्गावर असणाऱ्या दौंड या महत्वाच्या स्थानकावर थांबा न दिल्याने दौंडला थांबा द्या, अशी खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली आहे. दौंड हे या मार्गावरील अतिशय महत्त्वाचे जंक्शन आहे. त्यामुळे या एक्स्प्रेसचा थांबा दौंडमध्ये देण्यात यावा, असं त्यांनी ट्वीट केलं आहे. मात्र दौंडबरोबरच या मार्गावरील महत्त्वाच्या गावातही थांबा देण्यात आला नाही आहे.
मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर आजपासून सुरु करण्यात आली आहे. या एक्स्प्रेसचा पहिला दिवस आहे. त्यामुळे दौंडमध्ये ही एक्स्प्रेस थांबणार आहे. मात्र नेहमीच्या प्रवासात या एक्स्प्रेसला दौंडमध्ये थांबा नाही. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी ही मागणी केली आहे. मुंबईहून निघणारी ही एक्सप्रेस दादर, कल्याणहून थेट पुण्यात येणार आहे. मात्र या दरम्यानच्या महत्त्वाच्या असलेल्या लोणावळा स्थानकावर या गाडीचा थांबाच नाही. त्यामुळे मुंबईहून किंवा सोलापूरहून लोणावळ्याला जाणाऱ्या पर्यटकांना मात्र पुण्यातच उतरुन पुढचा प्रवास करावा लागणार आहे.
ट्वीटमध्ये काय लिहिलंय?
परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी या ट्रेनला दौंड स्थानकावर थांबा देण्याची आवश्यकता आहे. माझी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांना नम्र विनंती आहे की, कृपया वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा देण्याबाबत सकारात्मक विचार करावा,असं सुप्रिया सुळे यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई पासून सोलापूर येथे जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस १० फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. परंतु नागरीकांची मागणी असूनही या गाडीला दौंड येथे थांबा देण्यात आला नाही. दौंड हे या मार्गावरील अतिशय महत्त्वाचे जंक्शन आहे. pic.twitter.com/JQVjMAVsUH
— Supriya Sule (@supriya_sule) February 9, 2023
या महत्वाच्या गावात थांबेच नाही
पुण्याहून सोलापूरला जाणारी ही वंदे भारत एक्स्प्रेस फक्त पाच स्थानकावर थांबणार आहे. त्यात सीएसएमटी, दादर, कल्याण, पुणे, कुर्डूवाडी या स्थानकांचा समावेश आहे. मात्र या मार्गावर असणाऱ्या महत्वाच्या गावांमध्ये या एक्स्प्रेसचा थांबा देण्यात आला नाही आहे. लोणावळा, कर्जत, दौंड, मालठाण, माणिक पेठ, मोहोळ, मुर्धेवाडी या गावांचा त्यात समावेश आहे. मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेन ही देशातील नववी वंदे भारत ट्रेन आहे. सोलापूरमधील सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, सोलापूरजवळील पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना या ट्रेनमुळे प्रवास करता येणार आहे.
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसची वेळ?
गाडी क्र. 22225 आठवड्यातून सहा दिवस मुंबईतील सीएसएमटी स्थानकातून सुटणार आहे. ही ट्रेन बुधवारीही बंद राहणार आहे. गाडी क्र. 22226 सोलापूर ते मुंबई मार्गावर धावेल.
ट्रेनची वेळ...
ट्रेन 11 फेब्रुवारीला संध्याकाळी 4.05 वाजता सुरू होईल आणि त्याच दिवशी रात्री 10.40 वाजता सोलापूरला पोहोचेल.सोलापूर-22226 ही गाडी सोलापूरहून सकाळी 6: 05 मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12:35 ला सीएसएमटीला पोहोचेल.