(Source: ECI/ABP News/ABP Majha)
‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडेंना धक्काबुक्की
"मुळशी पॅटर्न' सिनेमाबाबत अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. हा सिनेमा काल्पनिक कथेवर आधारित आहे. चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर होतील", असंही प्रवीण तरडे यांनी यावेळी सांगितलं.
पुणे : ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपट प्रदर्शनाआधीच विविध कारणांनी चर्चेत आहे. मात्र आता प्रवीण तरडे यांना अज्ञातांनी धक्काबुक्की केल्याने पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.
आज दुपारी काही अज्ञात लोकांनी प्रवीण तरडे यांच्या पौड येथील कार्यालयामध्ये प्रवेश केला. आगामी 'मुळशी पॅटर्न' सिनेमातील काही संवाद आणि दृष्यांबाबत त्यांनी तरडे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या दरम्यान या तरुणांनी कार्यालयाची तोडफोड करत प्रवीण तरडे यांना धक्काबुक्की केली. घटनेनंतर तोडफोड करणाऱ्या तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला.
संपूर्ण प्रकाराबाबत बोलतांना प्रवीण तरडे म्हणाले की, "मुळशी गावातील काही अज्ञात मुलं माझ्या कार्यालयात आले होते. त्यांना सिनेमातील काही संवाद आणि दृष्यांबद्दल आक्षेप होता. यावेळी झालेल्या वादात त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. मात्र मला मारहाण झाली नसून केवळ धक्काबुक्की झाली."
"मुळशी पॅटर्न' सिनेमाबाबत अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. हा सिनेमा काल्पनिक कथेवर आधारित आहे. चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर होतील", असंही प्रवीण तरडे यांनी यावेळी सांगितलं.