75 वर्षीय नानांचा नाद खुळा, शर्यतीत बैलजोडीच्या पुढे घोडीवर बसून धुरळा
Bullock Cart Race: पुण्यातील मावळ तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीत बैलगाड्यांपेक्षा 75 वर्षीय मधू नाना पाचपुते यांनी जास्त लक्ष वेधून घेतले. पाचपुते यांनी बैलगाडा शर्यतीचा घाट गाजवलाय.
Bullock Cart Race : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवल्यानंतर आता राज्यभरात विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जात आहे. नुकतेच पुण्यातील मावळ तालुक्यात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत बैलगाड्यांपेक्षा जास्त लक्ष वेधून घेतले 75 वर्षीय मधू नाना पाचपुते यांनी. पाचपुते यांनी बैलगाडा शर्यतीचा घाट गाजवलाय. अगदी तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह आणि शैली आहे. त्यामुळेच राज्यातील बैलगाडा शौकीन त्यांचे जणू फॅन झाले आहेत. पाचपुते यांनी शर्यतीत बैलगाड्यांपुढं पळवलेली घोडी पाहण्यासाठी परिसरातून शौकीन गर्दी करत असतात. घोडी पळवताना त्यांचा उत्साह पाहण्यासारखाच असतो.
पाचपुते यांना शर्यतीत बैलजोडीपुढे घोडी पळवण्याचा छंद आहे. डोक्यावर टोपी, कपाळाला भंडारा, गळ्यात उपरणं आणि धोती-कुर्त्याचा पेहराव करून पाचपुते घोडीवर स्वार होतात. वयाच्या पंच्याहत्तरीतही नानांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि शरीराची हालचाल तरुणांना लाजवणारी ठरते. घाटात भिररररचा आवाज आला की बैलगाडा सुसाट धावतो.
पुण्याच्या खेडमधील चिंचोशी गावातील नानांच्या कुटुंबात तीस वर्षांपूर्वी पारो नावाची घोडी दाखल झाली. गेली आठ वर्षे बैलगाडा शर्यतीवर बंदी होती. परंतु, पाचपुते यांनी पारोचा खूप चांगला सांभाळ केला. पाचपुते यांच्या तीन पिढ्या बैलगाडा शर्यतीचा घाट गाजवत आहेत. त्यामुळेच मधू नानांना घोडी पळविण्याचा छंद जडला. गेल्या पन्नास वर्षांपासून ते घाटातील बैलजोड्यांपुढे ही घोडी पळवतात.
राज्यात कुठंही बैलगाड्यांचा घाट भरला की नाना आणि त्यांच्या घोडीची शौकिनांकडून आतुरतेने वाट पाहिली जाते. गावातील मंडळी केवळ नानांचा हा नाद पहायला घाटावर पोहचतात. नाना सध्या सोशल मीडियावर देखील तुफान गाजत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मावळमध्ये पुन्हा भिर्रर्रर्र, बैलगाडा शर्यतीला उत्स्फुर्त प्रतिसाद
- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सांगलीच्या नांगोळे गावात अधिकृतरित्या बैलगाडा शर्यतीचं आयोजन
- 'बैलगाडा शर्यतीच्या पहिल्या बारीत घोडीवर बसण्याचा शब्द पाळा'; आढळरावांचं अमोल कोल्हेंना आव्हान