Pune Bypoll Election : पुणे पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड; शरद पवारांसह मविआच्या नेत्यांना शिंदेंचे फोन
Pune Bypoll Election : कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत.
Pune Bypoll Election : कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे प्रयत्न सुरू आहेत. या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), जयंत पाटील यांना फोन केला आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी उमेदवार न देण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडी उमेदवार देणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विरोधी पक्षांना त्यांनी उमेदवार न देण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून दोन्ही ठिकाणी उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला विरोधक किती प्रतिसाद देतात, हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. कारण या दोन्ही ठिकाणी निवडणुका होणार असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केली आहे. कसब्यातून काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे. तर चिंचवडमध्ये कोण निवडणूक लढवणार याचा बसून निर्णय घेऊ. पण चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना आग्रही असल्याचे राऊत म्हणाले. या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. त्यामुळं या दोन्ही ठिकाणी निवडणुका होणार की, बिनविरोध होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा : केसरकर
कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. केसरकर शिर्डी इथे आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांश संवाद साधला. पोटनिवडणूक बिनविरोध झाली पाहिजे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. मागील काही काळात ती खंडित झाली होती. त्यावेळी शरद पवार यांनी पुढाकार घेऊन ती परंपरा पुन्हा सुरू केली आहे. पवारसाहेब हे सर्वांचेच नेते आहे. त्यामुळं ते बिनविरोध निवडणूक करतील, असे दिपक केसरकरही म्हणाले.
चिंचवडमध्ये अश्विनी जगताप तर कसब्यात हेमंत रासने
चिंचवड आणि कसबा या दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार जाहीर झाले आहेत. चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना अमेदवारी दण्यात आली आहे. अश्विनी जगताप या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहे. सातारा हे त्यांचं मुळ गाव आहे. निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची लेक आहेत. प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आहेत. या प्रतिष्ठानद्वारे महिला बचत गटांचं जाळं पसरवलं आहे. महिलांच्या विकासासाठी त्यांनी मोठं काम केलं आहे. लक्ष्मण जगताप निवडणुकीस उभे असताना त्या प्रचारात सक्रीय होत्या. मात्र निवडणूक त्या पहिल्यांदाच लढवत आहेत. तर दुसरीकडे कसब्यातून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रासने हे पुणे महानगर पालिकेचे भाजपचे नगरसेवक आहेत. पुणे महापालिकेचे भाजपचे ते दोन टर्म स्थायी समिती अध्यक्ष होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या: