Maharashtra Lockdown Updated: लोकांनी जर नियम पाळले नाही तर पूर्वीसारखा कडक लॉकडाऊन करावा लागेल : अजित पवार
लोकांनी जर नियम पाळले नाही तर पूर्वीसारखा कडक लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय.
पुणे : निर्बंध असले तरी अनेक ठिकाणी गर्दी दिसतेय. लोकांनी परिस्थितिचं गांभीर्य ओळखून नियमांचं पालन करावं. काल मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांनी ही बाब लक्षात आणून दिली. त्यामुळे लोकांनी जर नियम नाही पाळले तर मागील वेळेसारखा कडक लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पुण्यातील कौन्सिल हॉलला आयोजित कोरोना आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.
राज्यातील सर्व आमदारांना मिळणाऱ्या चार कोटींच्या विकास निधीपैकी एक कोटी रुपये कोरोनासाठी खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. असे साडेतीनशेपेक्षा अधिक आमदार आहेत. त्यामुळे साडेतीनशे कोटी रुपये कोरोनासाठी मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, ऑक्सिजनसाठी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे हे रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यासोबत बोलले असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार म्हणून आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करतो आहोत.
कोणीही सत्तेत असेल तरी त्याला आपल्या राज्यातील नागरिकांना उपचार मिळू नये असं वाटणार नाही. आम्ही केंद्राकडे लसीची मागणी करतो आहोत. डॉक्टरांचं म्हणणं आहे की सर्व पॉझिटीव्ह रुग्णांना रेमडिसीवीर इंजेक्शन्सची गरज नाही. आम्ही केंद्र सरकारला विनंती केल्यावर केंद्र सरकारने रेमडिसीवीर इंजेक्शन्सची परदेशात निर्यात करणं बंद केलं. आम्ही अनेक कंपन्यांसोबत रेमडीसीवीर इंजेक्शन्स मिळावीत यासाठी चर्चा करत अहोत.
निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली की घरात बसून प्रचार करता येत नाही. आज पाच राज्यात निवडणुका होत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या हातात जे होतं त्या सहकारातील निवडणुका आम्ही पुढं ढकलल्या असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तिकडे निवडणुकांसह कुंभमेळा सुरु असल्याचा टोला अजित पवारांनी लगावला. हे सरकार स्थिरं आहे. तुमच्या बोटाच्या नखाएवढाही त्याला धक्का नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. या बैठकीला भाजप नेते चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.
शिकाऊ डॉक्टरांनी त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा : अजित पवार
ससुनमधील ज्या शिकाऊ डॉक्टर्सने काम न करण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी त्याचा पुनर्विचार करावा. जिल्हाधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी त्यांच्याशी चर्चा करतायत. या डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काम करावं अन्यथा सरकारला नाईलाजाने काही निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही उपमुख्यमंत्र्यांनी दिलाय.
काय आहेत मागण्या?
पुण्यातील ससुन शासकीय रुग्णालय आणि बी जे मेडिकल कॉलेज मधील शिकाऊ आणि निवासी डॉक्टरांनी आज संध्याकाळपासून अतिदक्षता विभाग सोडून इतर काम न करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारने कोरोना रुग्णांसाठी बेड वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यासोबत कुशल मनुष्यबळ आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढवायला हवी, अशी या शिकाऊ डॉक्टरांची मागणी आहे. ही मागणी अनेकवेळा करुनही मान्य न झाल्याने या शिकाऊ डॉक्टरांनी अतिदक्षता विभाग सोडून इतर काम न करण्याचा निर्णय घेतलाय. या शिकाऊ डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेने अशाच प्रकारे उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून संपुर्ण महाराष्ट्रात अतिदक्षता विभाग सोडून इतर काम न करण्याचा निर्णय घेतलाय. पुण्यात अशा शिकाऊ डॉक्टरांची संख्या साडेचारशे आहे.