एक्स्प्लोर
बाबरी प्रकरणी काँग्रेसने नरसिंहरावांना बळीचा बकरा केला : माधव गोडबोले
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या गप्पा नावाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी बाबरी मशीद प्रकारणातील अनेक गुपीत गोष्टीही उघड केल्या.

पुणे : बाबरी प्रश्न हाताळताना काँग्रेसने तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही नरसिंहराव यांना बळीचा बकरा केला, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी केला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'गप्पा' नावाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी बाबरी मशीद प्रकारणातील अनेक गुपीत गोष्टीही उघड केल्या. माधव गोडबोले म्हणाले की, “बाबरी प्रश्न हाताळण्यासंदर्भात आम्ही तत्कालीन पंतप्रधानांना सूचना केल्या होत्या. पण त्या अंमलात आल्या नाहीत. याचं कारण मला त्यावेळी कळलं नाही. पण नरसिंहरावांच्या बाबरी प्रकरणाच्या पुस्तक प्रकाशनानंतर याचा उलगडा झाला. नरसिंहरावांनी त्यांच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे, काँग्रेसने त्यांना बळीचा बकरा केला.” याचं अधिकचं विश्लेषण करताना गोडबोले पुढे म्हणाले की, “काँग्रेसच्या रणनितीनुसार, जर बाबरी मशिद वाचली, तर त्याचं सर्व श्रेय पक्षाला मिळावं. आणि जर ती पडली, तर त्याचा सर्व दोषारोप पंतप्रधानांवर जावा. त्यामुळेच ते शेवटपर्यंत द्विधा मनस्थितीत होते. म्हणून नरसिंहरावांनी यावर निर्णय घेणं टाळलं.” याबाबतचं आणखी एक कारण देताना माधव गोडबोले पुढे म्हणाले की, “राज्यघटनेच्या तरतुदीप्रमाणे, 356 कलम ज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तरतूद आहे. ते कलम प्रत्यक्ष परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय लागू करता येत नाही. म्हणून त्यांनी नरसिंहरावांनी ते कलम लागू केलं नसावं.”
आणखी वाचा























