Lalit Patil Drug Case : विनय अरहानाच्या फ्लॅटमध्ये ललित पाटीलचा मुक्काम; जेल ते फ्लॅट... व्हाया ससून रुग्णालय, ललित पाटीलला पाठिंबा कोणाचा?
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहे. त्यातच ललित पाटील हा रोझरी स्कुलचा संचालक विनय अरहान यांच्या फ्लॅटवरुन ड्रग्स रॅकेट चालवत असल्याचं पुढे आलं आहे.
पुणे : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहे. त्यातच ललित पाटील हा रोझरी स्कुलचा संचालक विनय अरहानच्या फ्लॅटवरुन ड्रग्स रॅकेट चालवत असल्याचं पुढे आलं आहे. बँकेची फसवणूक केल्याच्या आरोपावरून अटक असलेला विनय अरहाना ससुनमधील वॉर्ड नंबर 16 मधे रहात होता. तिथे त्याची ललित पाटील सोबत ओळख झाली. या ओळखीतून ललित पाटील ससुन मधुन निघून अरहानाच्या फ्लॅटवर मुक्कामाला जात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ललित पाटीलला पाठिंबा नेमका कोणाचा होता?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ड्रग माफिया ललित पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे ज्या व्हिडिओमध्ये निवांतपणे गप्पा मारतानाचा व्हिडीयो समोर आला होता. तो व्हिडीओ पुणे कॅम्प भागातील सेंट्रल पार्क सोसायटीतील आहे. रोझरी स्कुलचा संचालक विनय अरहानचे या सोसायटीत दोन फ्लॅट आहेत. तर ललित पाटील ससून ऐवजी आपल्या सोसायटीत येऊन मुक्कम करायचा असा दावा पुणे कॅम्प भागातील एका सोसायटीतील रहिवाश्यांनी केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
ललित पाटीलचा मुक्काम ससूनमध्ये पण दौरा ससूनच्या बाहेर...
विनय अरहाना याचा फ्लॅट, त्यानंतर ससून जवळ असलेलं पंचतारांकित हॉटेल आणि ससून जवळ असलेल्या मॉलमध्ये ललित पाटील दौरे करत होता. नावाने तो कारागृहातील कैदी म्हणून ससून रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये उपचार घेत होता. मात्र, तो बाकी ठिकाणीही वावरत असल्याचं व्हि़डिओमधून समोर आलं आहे.
संजीव ठाकूरांना पोलीस वाचवत आहे...
ललित पाटील प्रकरणात आमदार रविंद्र धंगेकर यांनी पहिल्यापासून ससून रुग्णालय प्रशासनाच्या कामकाजाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच, ललित पाटील प्रकरणात ससुन रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची देखील त्यांनी सतत मागणी केली आहे. मात्र, प्रत्यक्षात अशी कोणतेही कारवाई होत नसल्याने पुणे पोलिसांच्या विरोधात रविंद्र धंगेकर आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. त्यांनी थेट पोलिसांवर आरोप केले आहे. पोलीसच ससून रुग्णालयातील डीन संजीव ठाकूर यांना वाचवत असल्याचं ते म्हणाले आहे.
कारागृहातील कॉन्स्टेबल ललितला फोन देऊन फसला...
ससून पाठोपाठ या प्रकरणात कारवाईचा बडगा आता येरवडा कारागृहातील प्रशासनावर देखील उगारण्यात आला आहे. कारागृहातील कॉन्स्टेबल मोईन शेख आणि कौन्सिलर म्हणून काम करणाऱ्या सुधाकर इंगलेला अटक करण्यात आली. ललित पाटील हा कारागृहात बसून ड्रग्स रॅकेट चालवत होता. त्या दरम्यान त्याला फोनची गरज भासत होती. याकाळात ललित पाटीलला विविध लोकांच्या संपर्कात राहावं लागत होतं. याच काळात मोईस शेखने ललित पाटीलला स्वतःचा फोन देऊन बाहेर ललितचा भाऊ भूषण पाटीलशी बोलण करून दिलं होतं.
इतर महत्वाची बातमी
Datta Dalvi : दत्ता दळवींची आजची रात्रही कारागृहातच जाणार, जामीन अर्जावर उद्या सुनावणी