(Source: Poll of Polls)
Datta Dalvi : दत्ता दळवींची आजची रात्रही कारागृहातच जाणार, जामीन अर्जावर उद्या सुनावणी
Datta Dalvi : माजी महापौर दत्ता दळवी यांच्या जामिन अर्जावर उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांची आजची रात्र देखील कारागृहातच जाणार आहे.
मुंबई : माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi) यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. दरम्यान दत्ता दळवी यांना जामीन (Bail) अद्याप मिळाला नसल्यामुळे त्यांची आजची रात्र देखील तुरुंगातच जाणार असल्याचं चित्र आहे. दत्ता दळवी यांच्या प्रकरणावर महानगर दंडाधिकारी मुलुंड एम आर वाशिमकर यांच्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. सुनावणी सुरु असताना अर्धा तास ही सुनावणी तहकूब करण्यात आली. तसेच सरकारी वकिलांनी युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागितला होता. त्याचप्रमाणे दत्ता साळवी यांच्या वकिलांनीकडून कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला.
दळवी हे जबाबदार नागरिक आणि सिनियर सिटिझन असून दोन पक्षात असलेल्या अंतर्गत वादामुळे त्यांनी हे वक्तव्य केलं. दळवी हे कायमस्वरूपी मुंबईचे रहिवासी आहेत. त्यामुळे कोर्टाने अटी शर्तींसह त्यांनी जामीन द्यावा अशी मागणी यावेळी दत्ता दळवींच्या वकिलांनी केली. त्याचप्रमाणे पोलीसांना सर्व प्रकारे सहकार्य करू, बंधनं पाळू अशी ग्वाही देखील दत्ता दळवींच्या वकिलांकडून कोर्टाला देण्यात आली होती. पण त्यानंतरही सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर कोर्ट जामीन अर्जावर निकाल देणार होतं. परंतु कोर्टाचं कामकाज संपल्यामुळे हा निकाल राखून ठेवण्यात आला.
दत्ता दळवींच्या गाडीची तोडफोड
जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. अज्ञातांनी दत्ता दळवींच्या घराच्या परिसरात शिरुन गाडीची तोडफोड केली आहे. आज सकाळी पोलिसांनी दत्ता दळवींना अटक केली आहे. कोर्टानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर तातडीनं दळवींच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला. मात्र आज जामिनावर निर्णय झाला नाही. त्यामुळे दळवींना ठाणे कारागृहाकडे नेण्यात आलं आहे. आज दळवींचे वकील पुन्हा जामिनासाठी अर्ज करणार आहेत.
कोण आहेत दत्ता दळवी? (Who Is Datta Dalvi)
बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक अशी दत्ता दळवींची ओळख. दत्ता दळवींनी आपली कारकीर्द सामान्य शिवसैनिक म्हणून केली. आपल्या आक्रमक स्वभावामुळे ते अल्पावधीतच पुढे आले आणि बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू बनले. शिवसेनेच्या विभाग क्रमांक 7 च्या विभागप्रमुखपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. तसेच 2005 ते 2007 या दरम्यान दत्ता दळवींनी मुंबईचे महापौर म्हणून काम केलं. या काळात त्यांनी आपली कारकीर्द चांगलीच गाजवली. ईशान्य मुंबईमध्ये दत्ता दळवींचा मोठा प्रभाव आहे.