Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
Hardik Pandya : भारतानं दक्षिण आफ्रिकेला 7 विकेटनं पराभूत करत टी 20 मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवली. हार्दिक पांड्यानं गोलंदाजी करताना एक विकेट मिळवली.

नवी दिल्ली : भारतानं धर्मशाला येथील टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेला 7 विकेटनं पराभूत केलं. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखल. यानंतर भारताच्या फलंदाजांनी 7 विकेट आणि 25 बॉल शिल्लक ठेवत विजय मिळवला. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं या मॅचमध्ये एक विकेट मिळवत इतिहास रचला. हार्दिक पांड्यानं ट्रिस्टन स्टब्सला 9 धावांवर बाद केलं. यासह त्याच्या आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये 100 विकेट पूर्ण झाल्या. हार्दिकनं आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यांमध्ये 1000 धावा केल्या आहेत. टी 20 मध्ये 100 विकेट आणि 1000 धावा करणारा हार्दिक पांड्या पहिला भारतीय ठरला आहे.
Hardik Pandya Recrod : पांड्याच्या टी 20 मध्ये 100 विकेट, 1000 धावा
हार्दिक पांड्या आशिया कप स्पर्धेत दुखापतग्रस्त झाल्यानंतर टीम बाहेर होता. त्यानं कटक येथील पहिल्या टी 20 च्या माध्यमातून कमबॅक केलं होतं. त्या सामन्यात हार्दिकनं 28 बॉलमध्ये नाबाद 59 धावा केल्या होत्या. त्या मॅचमध्ये त्यानं चार चौकार आणि चार षटकार मारले होते. कटक टी 20 हार्दिकनं 16 धावा देत 1 विकेट घेतली होती. पहिल्या टी 20 मध्ये हार्दिक पांड्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला होता.
आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये भारताकडून 100 पेक्षा जास्त विकेट घेण्याची कामगिरी यापूर्वी दोघांनी केलेली आहे. अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी 100 विकेटचा टप्पा पार केलेला आहे. अर्शदीप सिंगनं 69 सामन्यांमध्ये 107 विकेट घेतल्या आहेत. 9 धावांमध्ये 4 विकेट ही अर्शदीपची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर, जसप्रीत बुमराहनं 81 मॅचमध्ये 101 विकेट घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी 7 धावांमध्ये 3 विकेट अशी आहे. आजच्या मॅचपूर्वी हार्दिक पांड्यानं 122 टी 20 समन्यांमध्ये 99 विकेट घेतल्या होत्या. त्याची सर्वोत्तम कामगिरी 16 धावांवर 4 विकेट अशी आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार केला तर हार्दिक पांड्या प्रमाणं म्हणजेच टी 20 मध्ये 1000 धावा आणि 100 विकेट अशी कामगिरी चार क्रिकेटपटूंनी केलेली आहे. शाकिब उल हसन, मोहम्मद नबी, सिकंदर रझा आणि विरानदीप सिंग अशी त्या खेळाडूंची नावं आहेत. हार्दिक पांड्या या चौघांनंतर अशी कामगिरी करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे.
भारताची टी 20 मालिकेत आघाडी
भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उर्वरित दोन सामने आता 17 डिसेंबर आणि 19 डिसेंबरला होणार आहेत. 17 डिसेंबरचा सामना लखनौच्या एकाना स्टेडियममध्ये होईल. तर, 19 डिसेंबरचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.





















