Indrayani Kundmala bridge collapse: मावळातील कुंडमळा पुल दुर्घटनेनं पुणे हादरलं; 4 जणांचा मृत्यू, 52 जण बचावले; आत्तापर्यंत काय काय घडलं?
Indrayani Kundmala bridge collapse: 52 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले. 51 जण जखमी झाले असून यातील ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. अंधार झाल्यानंतर मदत व शोधकार्य थांबवण्यात आले.

मावळ : मावळ तालुक्यातील कुंडमळा (Kundmala bridge collapse) येथील इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल रविवारी (16 जून) दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक कोसळला. या दुर्घटनेत पुलावर उभे असलेले अनेक पर्यटक नदीत कोसळून वाहून गेले. सायंकाळपर्यंतच्या माहितीनुसार ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 52 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले. 51जण जखमी झाले असून यातील ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. अंधार झाल्यानंतर मदत व शोधकार्य थांबवण्यात आले.(Kundmala bridge collapse)
रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंडमळा येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. 100 ते 150 पर्यटक पुलावर उभे होते. त्याचवेळी पूल मधोमध तुटून कोसळला, आणि अनेकजण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. आरडाओरडा, घबराटीचे वातावरण निर्माण झाले. काही स्थानिक तरुणांनी प्रसंगावधान राखून पाण्यात उड्या टाकून काही पर्यटकांचे प्राण वाचवले. तत्काळ तळेगाव पोलीस, अग्निशमन दल, वन विभाग, बचाव पथके व स्वयंसेवी संस्था घटनास्थळी दाखल झाल्या आणि मदतकार्य सुरू केले. घटनास्थळावर नागरिकांची गर्दी झाली होती.
नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची मृतांप्रती श्रद्धांजली
या दुर्घटनेची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी संपर्क साधून शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटद्वारे मृतांप्रती श्रद्धांजली अर्पण केली व मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.
"दहा दिवसांपूर्वीच पूल वापराला मनाईचे आदेश"
दुर्घटना झालेला पूल 35 वर्षे जुना असून जीर्ण अवस्थेत होता. दोन महिन्यांपूर्वीच यावरून वाहतूक बंद करण्यात आली होती आणि दुरुस्तीसाठी निधीही मंजूर झाला होता. 10 दिवसांपूर्वी प्रशासनाने पर्यटकांना धोकादायक स्थळांपासून दूर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी न झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
स्थानिकांचा रोष आणि चौकशी आदेश
घटनास्थळी पोलिसांची उपस्थिती नसल्याने संतप्त स्थानिकांनी निषेध व्यक्त केला. योग्य वेळेवर पोलिसांनी हस्तक्षेप केला असता, तर दुर्घटना टळू शकली असती, असे त्यांचे म्हणणे आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जाहीर केले. चौकशी अहवालानंतर जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गंभीर जखमींची नावे
श्रीकांत गरूड, शुभम वाळुंजकर, सुनील कागवाडे, सुमेर कागवाडे, विजय यनकर, कृष्णा गांधी, आर्यन गायसमुद्र, दीपक वीरकर, सिद्धी बोत्रे, ऑकार पेहरे, चंद्रकांत चौगुले, सानवी भाकरे, वर्षा भाकरे, योगेश भंडारे, संजय भोपे, दिव्या भोपे, सिद्धासम बांदल, समर्थ सिद्धाराम सोलापुरी, शंतनू निगडे, गोपाळ तीवर, वैशाली उपाध्याय, शिल्पा भंडारे, यास्मिन चौधरी, अशोक भेगडे, सुनील कुमार, वैभव उपाध्याय, अंजूम शहा, अमोल घुले, चित्रलेखा गौर, शमिका माने, होराजी आगलावे, इंदोल तावरे, सुरेश पडवळ, मोनाली पडवळ, वेदांती पडवळ, विनीत पडवळ, योगेश पडवळ, रोहन शिंदे, प्रथमेश पलालकर, अभिषेक पाटील, शौकत गौर, तेजस देवसय, प्रथमेश देवरे, सौरम माने, दीपक कांबळे, ओमकार गिरी, प्रकाश काकडे, साहिल शेटे, सलोनी उपाध्याय, लतिका गौड.
मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
एनडीआरएफच्या जवानांनी हा पूल मधोमध कट केला असून क्रेनच्या सहाय्याने तो पूल उचलला जात आहे. या पुलाखाली एक मुलगा अडकला होता. त्याला बाहेर काढण्यात आलं आहे. आणखी एक व्यक्ती पुलाच्या खाली दबला असून त्यालाही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत राज्य सरकारकडून केली जाणार आहे. तर या घटनेत जखमी झालेल्यांचा उपचाराचा खर्चही सरकारकडून केला जाणार आहे.
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर काही प्रश्न उपस्थित होतात?
- इंद्रायणी नदीवरचा पूल कमकुवत झाल्यानं त्यावरून ये-जा करण्यास मनाई होती, मग पर्यटक पुलावर कसे काय चढले?
- पर्यटकांनी पुलावर जाऊ नये म्हणून प्रशासनाने कोणाला जबाबदारी दिली होती? अन ते रविवारी कुठं होते?
- हा पूल दीड वर्षांपूर्वी वापरासाठी बंद केला होता, तर तेंव्हापासून पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही?
- गेल्या दीड वर्षात नवा पूल उभारायला सुरुवात का झाली नाही?
- आता 10 जूनला टेंडर आणि वर्क ऑर्डर काढल्याचा दावा आहे, पण गेली दीड वर्ष ही दिरंगाई कोणामुळं?
इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूलचं वैशिष्ट्य काय?
- 1990 साली पुलाचे काम सुरु झालं
- 1993 साली हे पूल तयार झालं, तेव्हापासून वापरात
- 2023 साली म्हणजे 30 वर्षानंतर हा पूल जीर्ण झाल्याचं निदर्शनास
- दीड वर्षांपासून हा कमकुवत पूल वापरास बंद
- नव्या पूल उभारणीसाठी 8 कोटींचा निधी
- सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडर काढून वर्क ऑर्डर ही दिल्याचा प्रशासनाचा दावा
- प्रत्यक्षात कामाला पावसानंतर सुरुवात होण्याची शक्यता























