Jayant Patil on Amol Kolhe : अजितदादांनी पाडण्याची घोषणा केली, पण जयंत पाटलांनी अमोल कोल्हेंची उमेदवारी जाहीर करून टाकली!
Jayant Patil on Amol Kolhe : शिरूर लोकसभा निश्चय मेळावा आणि भोसरी विधानसभेची आढावा बैठक जयंत पाटलांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत जयंत पाटलांनी अमोल कोल्हेंच्या उमेदवारीर शिक्कामोर्तब केले.
पुणे : राष्ट्रवादीच्या फुटीपासून चर्चेत असलेल्या शिरुरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली. शिरूर लोकसभा (Shirur Loksabha) निश्चय मेळावा आणि भोसरी विधानसभेची आढावा बैठक जयंत पाटलांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत जयंत पाटलांनी अमोल कोल्हेंच्या उमेदवारीर शिक्कामोर्तब केले.
अमोल कोल्हे अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडल्यापासून चर्चेत आहेत. कोणता झेंडा हाती घेऊ असा मनस्थितीत असल्याचे त्यांच्या वर्तनातून समोर आलं आहे. अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी नंतर भूमिका बदलून शरद पवार यांना पाठिंबा दिला होता. यानंतर निवडणुक आयोगात दोन्ही गटाकडून लढाई सुरु झाल्यानंतर त्यांनी दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर केले होते. नंतर त्यांनी पुन्हा अजित पवार गटाकडून फसवून प्रतिज्ञापत्र घेतल्याचा आरोप केला होता. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं आहे.
अजित पवारांनी अमोल कोल्हेंविरोधात थेट दंड थोपटले
दुसरीकडे, अजित पवारांनी अमोल कोल्हेंविरोधात थेट दंड थोपटले आहेत. अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, पण यावेळी पाडणार म्हणजे पाडणारच, असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंना थेट आव्हान दिलं आहे. यानंतर अजित पवार यांना कोल्हे यांनी सुद्धा प्रत्युत्तर देत डिवचले होते. सरकार सोडवू न शकलेल्या समस्या मी शेतकरी आक्रोश मोर्चातून मांडत आहे. त्यामुळं अजित दादांची चिडचिड होते का? हे तुम्ही त्यांनाच विचारा. असं म्हणत कोल्हे यांनी बारामती विधानसभेतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पाढा वाचलवा होता. सत्ता संघर्षावेळी जनता आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेत गेल्याचं ते म्हणाले. ते मंत्री झाल्यावर त्यांचं जेसीबीतून पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत झालं. पण आता मात्र त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला. म्हणूनच शेतकरी मला कांदा, खर्डा-भाकरी देऊन साधपणाने स्वागत करतायेत अन त्यांचे प्रश्न मांडायला साथ देतायेत, असं कोल्हे यांनी म्हटले होते.
इतर महत्वाच्या बातम्या