Jammu Kashmir Pahalgam terror attack: महाराष्ट्रासाठी वाईट बातमी, दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या पुण्यातील आणखी दोघांचा मृत्यू
Jammu Kashmir Pahalgam terror attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा भारतासाठी मोठा धक्का आहे.

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांचा समावेश आहे. काल रात्री ही बातमी समोर आली तेव्हा महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू (Tourist Died in Kashmir) झाला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रातील आणखी दोन पर्यटकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजते. हे दोन्ही पर्यटक पुण्यातील (Pune News) असल्याचे समजते. पुण्यातील जगदाळे आणि गणबोटे कुटुंबीय हे काश्मीरला फिरायला गेले होते. हे पाच जण पहलगामध्ये असताना त्यांच्यावर हल्ला (Pahalgam terror attack) झाला. दहशतवाद्यांनी जगदाळे आणि गणबोटे कुटुंबातील पुरुषांना धर्म विचारला आणि त्यानंतर गोळी घातली. यामध्ये कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी रात्री उशीरा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. गणबोटे यांचे बंधू हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. या हल्ल्यात अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रातले 5 पर्यटक जखमी झालेत. तर एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल, संतोष जगदाळे, कौस्तुभ गनबोटे या हल्ल्यात जखमी झालेत. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांमध्ये दोन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती आहे. टीआरएफ या दहशतवादी संघटनेने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. मार्चमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर शेकडोंच्या संख्येनं पर्यटक काश्मीरमध्ये फिरायला येतात. यंदाही पर्यटन वाढल्यानं सर्वसामान्य काश्मिरी नागरिक आनंदात होते. पण बऱ्याच काळानंतर काश्मीरमध्ये पहिल्यांदाच पर्यटकांना टार्गेट करण्यात आले. जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कर घटनास्थळी दाखल झाले असून, परिसराची नाकाबंदी करून, सर्च ऑपरेशन राबवण्यात येतं आहे. पर्यटकांवर झालेल्या गोळीबारानंतर काश्मीरमधील पर्यटक पुन्हा आपापल्या राज्यांमध्ये परतू लागले आहेत.
PM Modi in Delhi: दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी दिल्लीत दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले होते. मात्र, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्याचे वृत्त समजताच पंतप्रधान मोदी हे सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून माघारी परतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी दिल्ली विमानतळावर दाखल झाले. यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली कॅबिनेटच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील कालपासून काश्मीरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पर्यटकांवर हल्ला केलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी लष्कराकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे.
आणखी वाचा
























